कर्नाटक एसटी बंदमुळे मिरजेतून सीमेपर्यंत वडाप जोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:30 AM2021-09-23T04:30:35+5:302021-09-23T04:30:35+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क मिरज : मिरजेतून कर्नाटक एसटी सेवा बंद असल्यामुळे वडाप वाहतूक जोरात सुरू आहे. बेकायदा प्रवासी वाहतूक ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
मिरज : मिरजेतून कर्नाटक एसटी सेवा बंद असल्यामुळे वडाप वाहतूक जोरात सुरू आहे. बेकायदा प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीप, रिक्षा आदी वाहनांवर वाहतूक नियंत्रण शाखेने कारवाई करावी, अशी मागणी रिक्षा संघटनेने केली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले दोन महिने मिरजेतून कर्नाटकात जाणाऱ्या एसटी बसेस बंद आहेत. एसटी वाहतूक सीमेपर्यंतच सुरू असल्याने मिरज बसस्थानकासमोरून रिक्षा व वडापमधून कागवाड सीमेपर्यंत प्रवासी वाहतूक सुरू आहे. बसस्थानकासमोर प्रवासी घेण्यासाठी वडाप चालकांची स्पर्धा सुरू असते. रस्त्यावर थांबलेल्या वाहनांमुळे येथे वाहतुकीची कोंडी होत आहे. बेकायदा वडापवर कारवाई होत नसल्याने नियमानुसार व्यवसाय करणाऱ्या रिक्षाचालकांवर अन्याय होत असल्याची तक्रार आहे. याबाबत वारंवार वाहतूक नियंत्रण शाखेकडे तक्रारी करूनही याकडे दुर्लक्ष असल्याने वाहतूक रिक्षा चालकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
कर्नाटक राज्यात एसटीला बंदी असल्यामुळे बस स्थानकासमोरून सीमेपर्यंत वाहतूक सुरू आहे. मात्र कर्नाटकातून येणाऱ्या वडाप वाहनांना सीमेवर रोखण्यात येत नसल्याने कर्नाटक वाहनांतून प्रवास करण्यासाठी गर्दी आहे. मिरजेतून बेकायदा प्रवासी वाहतूक जोरदार सुरू असल्याने कागवाड सीमेपर्यंत जाणाऱ्या एसटीलाही याचा फटका बसला आहे. वडाप वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाईची मागणी रिक्षा संघटनांनी निवेदनाद्वारे केली आहे.