नियोजनाच्या अभावानेच डफळापूरला पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 11:25 PM2018-05-30T23:25:22+5:302018-05-30T23:25:22+5:30
संस्थानकालीन गाव म्हणून परिचित असलेल्या डफळापूर (ता. जत) गावाची लोकसंख्या पंधरा हजारांहून अधिक आहे. गावाच्या चारही बाजूस चार तलाव असून गावात अनेक विहिरी आहेत. परंतु
संजयकुमार गुरव ।
संस्थानकालीन गाव म्हणून परिचित असलेल्या डफळापूर (ता. जत) गावाची लोकसंख्या पंधरा हजारांहून अधिक आहे. गावाच्या चारही बाजूस चार तलाव असून गावात अनेक विहिरी आहेत. परंतु नियोजनाअभावी ग्रामस्थांना भीषण पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. चाळीस वर्षात गावात सहा पाणी योजना राबविण्यासाठी कोट्यवधींचा खर्च करुनही, पाणी समस्या जैसे थे! तसेच नवीन येणाऱ्या पाणी संकटांना डफळापूरकरांना सामोरे जावे लागणार, या समस्येचा वेध घेणारी मालिका...
डफळापूर : डफळापूर गाव व वाडी-वस्तीसाठी २०११ मध्ये राष्ट्रीय पेयजल योजनेतून बसप्पाचीवाडी तलावाद्वारे नळपाणी पुरवठा योजनेसाठी साडेसात कोटी रुपयांची योजना मंजूर झाली. सुरुवातीला या योजनेस निधी देण्यास प्रशासनाने चालढकल केली.
बसाप्पाचीवाडी ग्रामस्थांकडून या योजनेस विरोध केल्यामुळे ती जागा सोडून ही योजना बसाप्पाचीवाडी तलावातील अंकले हद्दीतून करण्याचे ठरले. त्यानुसार राहिलेल्या जलवाहिनेचे काम केले. ठेकेदाराने आतापर्यंत तीन कोटीची कामे केली आहेत. डफळापूर गाव ते बसाप्पाचीवाडी तलावापर्यंत १३ किलोमीटर जलवाहिनी करण्यात आली आहे. टेकडीवर दोन टाक्या बांधण्यात आल्या. बसप्पाचीवाडी तलावातील बंद पडलेल्या प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेचे जॅकवेल या योजनेला जोडले. शुद्धीकरण टाकी, डफळापूर गाव व वाडी-वस्तीअंतर्गत जलवाहिनी करणे बाकी आहे.
राष्ट्रीय पेयजल योजनेचे अध्यक्ष जत पंचायत समिती माजी सभापती सुनील चव्हाण यांनी अथक प्रयत्नातून व संघर्षातून ही राष्ट्रीय पेयजल योजना मार्गी लावली असताना त्यांच्या मृत्यूनंतर या योजनेला घरघर लागली.
त्यानंतर बाळासाहेब पाटील यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यांच्या प्रयत्नातून ही योजना पूर्णत्वाकडे जात असताना डफळापूर राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत नवीन खांब व डीपीसाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून महावितरणकडे ही रक्कम भरणा केली आहे. त्यानुसार महावितरणने निविदा काढली आहे. परंतु मक्तेदाराला वर्कआॅर्डर देऊन सुध्दा तो काम करण्यात चालढकल करत आहे.
बसप्पाचीवाडी तलावातील जॅकवेलपर्यंत वीज जोडणी तातडीने करणे गरजेचे आहे. हे काम झाल्यास तसेच म्हैसाळ योजनेतून बसप्पाचीवाडी तलावात तातडीने पाणी सोडले, तर जॅकवेलमधून मोटारीद्वारे थेट डफळापूरच्या पाणीपुरवठा आडात पाणी आणता येईल. यामुळे डफळापूरचा पाणीप्रश्न सुटेल. अनेक अडथळ्यांना तोंड देत राष्ट्रीय पेयजल योजनेची पूर्णत्वाकडे वाटचाल होत असली तरी, ही योजना ग्रामस्थांना मृगजळ वाटते आहे. ही योजना पूर्ण कधी होणार, असा प्रश्न आहे. हे काम तातडीने पूर्ण करा, अन्यथा रस्त्यावर उतरुन आंदोलन करणार असल्याचा इशारा जत पंचायत समितीचे माजी सभापती मन्सूर खतीब व डफळापूरच्या सरपंच बालिका चव्हाण यांनी दिला आहे.
डफळापूरचा पाण्यासाठी टाहो :