सांगली येथील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात उपचाराअभावी रुग्णाचा मृत्यू, डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बळी गेल्याचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 01:06 PM2017-12-05T13:06:14+5:302017-12-05T13:14:14+5:30
सांगली येथील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात भरत गणपती बुरुड (वय ५२, रा. पंचशीलनगर, सांगली) या रुग्णाचा उपचाराअभावी मृत्यू झाला. सोमवारी दुपारी ही घटना घडली. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बुरुड यांचा बळी गेल्याचा आरोप करुन त्यांच्या नातेवाईकांनी सायंकाळी रुग्णालयाच्या आवारात प्रचंड गोंधळ घातला. डॉक्टरांवर कारवाई केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा इशारा दिल्याने तणाव निर्माण झाला होता.
सांगली : येथील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात भरत गणपती बुरुड (वय ५२, रा. पंचशीलनगर, सांगली) या रुग्णाचा उपचाराअभावी मृत्यू झाला. सोमवारी दुपारी ही घटना घडली. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बुरुड यांचा बळी गेल्याचा आरोप करुन त्यांच्या नातेवाईकांनी सायंकाळी रुग्णालयाच्या आवारात प्रचंड गोंधळ घातला. डॉक्टरांवर कारवाई केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा इशारा दिल्याने तणाव निर्माण झाला होता.
भरत बुरुड यांच्या छातीत दुखू लागल्याने नातेवाईकांंनी त्यांना दुपारी साडेबारा वाजता उपचारार्थ शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. आकस्मिक दुर्घटना विभागात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना वॉर्ड क्रमांक ६२ मध्ये हलविण्यात आले. पण या वॉर्डात त्यांच्यावर कोणतेही उपचार केले नाहीत. इंजेक्शन, सलाईन तसेच साधी गोळीही दिली नाही. नातेवाईकांनी उपचार कधी सुरु करताय? अशी डॉक्टरांकडे विचारणा केली.
डॉक्टरांनी ईसीजीचा अहवाल आल्यानंतरच उपचार सुरु करावे लागतील, असे सांगितले. बुरुड यांच्या छातीतील वेदना वाढल्यानंतर नातेवाईकांनी परिचारिकांकडे इंजेक्शन देण्याची मागणी केली. तरीही परिचारिकांनी काहीच केले नाही. आम्ही अजून जेवणार आहोत, जेवण केल्यानंतर बघू, असे उत्तर देऊन दुर्लक्ष केले, असा नातेवाईकांचा आरोप आहे.
तब्बल दोन तास उपचाराअभावी बुरुड तडफडत होते. अखेर अडीच वाजता त्यांचा मृत्यू झाला. कोणतेही उपचार न मिळाल्यानेच त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत नातेवाईकांनी वॉर्डातच गोंधळ घातला. आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा त्यांनी इशारा दिला. त्यामुळे मृतदेह वॉर्डातच होता. रुग्णालय प्रशासनाने त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण ते ऐकण्याच्या तयारीत नव्हते.
प्रशासने यासंदर्भात विश्रामबाग पोलिसांत तक्रार दिली. त्यामुळे नातेवाईक अधिकच भडकले. उपचाराअभावी रुग्णाचा मृत्यू झाल्याचे समजताच बुरुड यांचे नातेवाईक तसेच मित्रपरिवार सायंकाळी रुग्णालयात मोठ्या संख्येने जमा झाला. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी रुग्णालयाच्या आवारात बंदोबस्त तैनात केला होता.
डॉक्टरवर कारवाईची मागणी
बुरुड यांच्यावर काहीच उपचार न केल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी वॉर्डातील डॉक्टर, तसेच पारिचारिका यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली. तसेच डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली. जोपर्यंत डॉक्टरवर कारवाई होत नाही व गुन्हा दाखल केला जात नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा इशारा दिला.
रात्री उशिरापर्यंत त्यांचे म्हणणे ऐकण्यासाठी रुग्णालय प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आले नव्हते. त्यामुळे बुरुड यांचा मृतदेह वॉर्डातच होता. तसेच नातेवाईक रुग्णालयाच्या आवारात तळ ठोकून बसले होते.