सांगली महापालिकेसाठी नव्या नेतृत्वाचा कस... मदनभाऊ, पतंगरावांची उणीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 10:54 PM2018-06-27T22:54:15+5:302018-06-27T22:54:34+5:30
शीतल पाटील ।
सांगली : महापालिकेची यंदाची निवडणूक अनेक कारणांनी गाजणार आहे. पहिल्यांदाच भाजप सत्तेचा दावेदार बनला आहे, तर काँग्रेस-राष्ट्रवादीसमोर बालेकिल्ला शाबूत ठेवण्याचे आव्हान आहे. मदन पाटील, पतंगराव कदम हे दोन दिग्गज नेते काळाच्या पडद्याआड गेले. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांतील नव्या दमाच्या तरुण व ज्येष्ठ नेत्यांना स्वत:चे कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोणाच्या नेतृत्वाची चुणूक दिसेल, याची उत्सुकता लागली आहे.
सांगली महापालिकेच्या गेल्या अनेक निवडणुकांवर मदन पाटील यांचे वर्चस्व राहिले आहे. महापालिकेच्या स्थापनेपासून २० वर्षांतील केवळ महाआघाडीचा काळ वगळता मदनभाऊंचे नेतृत्व जनतेने स्वीकारले. त्यांच्यावर विश्वास टाकत सत्ता सोपविली. मदनभाऊंच्या निधनामुळे काँग्रेसचे नेतृत्व त्यांच्या पत्नी जयश्रीताई पाटील यांच्याकडे आले आहे. मदनभाऊंच्या मुशीत तयार झालेल्या कार्यकर्त्यांना त्या कशा हाताळतात, यावर त्यांच्या नेतृत्वाचा कस लागेल. मदनभाऊंचा पक्षावर अंकुश होता, तसाच अंकुश जयश्रीतार्इंना पक्षात आणि बाहेर ठेवावा लागेल. त्यांना केवळ भाजप, शिवसेना या विरोधकांशी लढायचे नाही; तर काँग्रेसअंतर्गत दुसऱ्या गटाशीही सामना करावा लागणार आहे.
काँग्रेसचे युवा नेते विशाल पाटील यांच्या राजकीय भवितव्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. त्यांना केवळ भाषणे ठोकून चालणार नाही, तर काँग्रेसअंतर्गत विविध गटांशी समन्वय साधावा लागेल. त्यांच्या फटकळ स्वभावामुळे अनेक नेते, कार्यकर्ते दुखावले जातात, पण वसंतदादांचा वारसा त्यांच्या पाठीशी असल्याने महापालिका हद्दीत नेतृत्वाची मोठी पोकळी भरण्याची संधी त्यांना मिळू शकेल.
पतंगराव कदम यांच्या अचानक निधनाने आमदार विश्वजित कदम यांच्यावर पक्षाची मोठी जबाबदारी आली आहे. ते युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षही आहेत. शिवाय जिल्ह्यातील काँग्रेसचे विधानसभेचे एकमेव आमदार आहेत. गत निवडणुकीत पतंगरावांनी महापालिकेची जबाबदारी घेतली होती. यंदा ही जबाबदारी विश्वजित यांच्यावर आली आहे. ती त्यांनी समर्थपणे पेलल्यास त्यांच्या नेतृत्वावरही शिक्कामोर्तब होणार आहे.
राजकारणाचा पिंड नसलेल्या आमदार सुधीर गाडगीळ यांच्यासाठी ही निवडणूक कसोटीची ठरणार आहे. स्वच्छ प्रतिमा असलेल्या गाडगीळांना स्वत:चे नेतेपद सिद्ध करण्याची मोठी संधी आहे. पण पक्षांतर्गत कुरबुरींनी त्यांनाही घेरले आहे. त्यांच्यासाठी ही निवडणूक विधानसभेची रंगीत तालीम आहे. त्यामुळे ते ही संधी दवडणार नाहीत. सभांचे फड गाजविण्याचा त्यांचा स्वभाव नसला तरी, त्यांच्या प्रतिमेचा भाजपला फायदा होणार आहे.
काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील गेल्या दोन वर्षांपासून सांगलीत कार्यरत झाले आहेत. त्यांच्याही नेतृत्वाचा या निवडणुकीत कस लागणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीत आघाडीचे संकेत असले तरी, जागा वाटपाचा तिढा त्यांच्या नेतृत्वाखाली सोडविला जाईल. काँग्रेसमधील महत्त्वाकांक्षी नेत्यांशी समन्वय साधून त्यांना राजकीय वाटचाल करावी लागेल. महापालिकेत काँग्रेसची सत्ता आल्यास त्यात पृथ्वीराज पाटील यांच्या नेतृत्वाला वेगळी झळाळी मिळणार आहे.महापालिकेचे राजकारण नव्या नेतृत्वाकडे जात आहे. मतदारांना आकर्षित करण्याची किमया कोण करतो, यावर या नेत्यांचे भवितव्य अवलंबून आहे.
पवार गटासाठी : विधानसभेची पूर्वतयारी
संभाजी पवार सध्या फारसे राजकारणात सक्रिय नाहीत; पण त्यांचे पुत्र पृथ्वीराज व गौतम या दोघांनी आपला गट जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. गतवेळी जयंत पाटील यांच्याशी फारकत घेत संभाजी पवारांनी स्वतंत्र आघाडी केली. त्याचा फायदा काँग्रेसला झाला. आता पवार गट शिवसेनेत आहे. या गटाची ताकद शिवसेनेशी जोडली गेल्यास पहिल्यांदा शिवसेनेचाही महापालिकेत दमदार प्रवेश होईल. ही निवडणूक पवार गटासाठी विधानसभेची निवडणुकीची तयारी ठरणार आहे.