जत तालुक्यात लॉकडाऊनमुळे शेतकरी, व्यावसायिक अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:26 AM2021-04-16T04:26:09+5:302021-04-16T04:26:09+5:30
जत : राज्यातील वाढता कोरोना लक्षात घेऊन राज्य सरकारने वीकेंड लाॅकडाऊन व इतर दिवशीही काही दुकाने बंद करण्याचे जाहीर ...
जत : राज्यातील वाढता कोरोना लक्षात घेऊन राज्य सरकारने वीकेंड लाॅकडाऊन व इतर दिवशीही काही दुकाने बंद करण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे जत तालुक्यातील शेतकरी व लहान मोठे व्यवसाय करणारे आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे लाॅकडाऊनचे नियम शिथिल करावेत, अशी मागणी विविध सामाजिक संघटनेतर्फे केली आहे.
सध्या सुरू असलेला लॉकडाऊन शेतकऱ्यांना व छोट्या व्यवसाय करणाऱ्यांना अडचणींचा ठरत आहे. लॉकडाऊनचा गैरफायदा घेऊन शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे दर दलाल व व्यापाऱ्यांकडून पाडले जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना, सर्वसामान्य नागरिक व ज्यांचे हातावरचे पोट आहे, अशा लोकांना लॉकडाऊन परवडत नाही. लॉकडाऊन सुरू करण्यापूर्वी शेतमजूर व गोर गरिबांच्या बँक खात्यात सरकारने प्रत्येकी पाच हजार रुपये मदत जमा करावी किंवा लॉकडाऊनच्या जाचक अटी रद्द करून नियम कडक करावेत, अशी मागणी करण्यात येत आहे.
लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांना खूप मोठा आर्थिक फटका बसत आहे. सरकारने शेतकरी वर्गाकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. हे शक्य होत नसेल तर शेतकरी व सर्वसामान्य जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा दिला जात आहे. आठवडा बाजार बंद केल्यामुळे सध्याच्या परिस्थितीत दर कमी मिळत आहेत. दर कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांचा माल शेतात पडून आहे. नाशवंत फळे, भाजीपाला, आदी शेतीमाल उन्हाळ्यात रानात जास्त दिवस तग धरून राहू शकत नाही. बाजारात माल कसा घेऊन जाणार हा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. बाजार बंद असल्यामुळे लिलाव बंद झाले आहेत, शेतकऱ्यांच्या शेतात येऊन माल कोण विकत घेणार आहे? असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत. लॉकडाऊनच्या जाचक अटीने शेतीमाल बाजारात येणे अशक्य आहे. शेतकऱ्यांना न्याय कोण देणार असा प्रश्न जत तालुक्यातील शेतकऱ्यांना पडला आहे.