ग्रामपंचायतींनी दुर्लक्ष केल्यामुळे जत तालुक्यात दूषित पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 03:38 PM2019-06-17T15:38:03+5:302019-06-17T15:40:02+5:30
जत तालुक्यात अवकाळी पावसाने दडी दिल्याने भीषण दुष्काळाची दाहकता वाढली आहे. दुष्काळाचा सामना करताना नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या ठिकाणाहून गाळमिश्रित, हिरवट रंगाच्या, शेवाळलेल्या दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. ग्रामस्थांना दूषित पाणी प्यावे लागत असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे तालुक्यातील दूषित पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
गजानन पाटील
संख : जत तालुक्यात अवकाळी पावसाने दडी दिल्याने भीषण दुष्काळाची दाहकता वाढली आहे. दुष्काळाचा सामना करताना नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या ठिकाणाहून गाळमिश्रित, हिरवट रंगाच्या, शेवाळलेल्या दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. ग्रामस्थांना दूषित पाणी प्यावे लागत असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे तालुक्यातील दूषित पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागामार्फत तपासणी केलेल्या नमुन्यांपैकी तालुक्यातील २८ गावांत पाणी नमुने दूषित असल्याचे आढळले आहे. टीसीएलमध्ये क्लोरीनचे प्रमाण २० टक्क्यांहूनही कमी आढळले आहे. निर्जंतुकीकरणाची टीसीएल पावडर निकृष्ट प्रतीची आढळून आली आहे.
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रत्येक महिन्यात पाणी शुद्धीकरणासाठी वापरण्यात येणाऱ्या टीसीएल नमुन्याची तपासणी घेतली जाते. त्यामध्ये तालुक्यातील २८ गावांत नमुने दूषित आढळले आहेत. यात तालुक्यातील बेवनूर, गुळवंची, दरीबडची, अंकलगी, मोरबगी, दरीकोणूर, बालगाव, खंडनाळ, लोहगाव, खोजानवाडी, हळ्ळी, सुसलाद, लमाणतांडा (उटगी), बेळोंडगी, उंटवाडी, उमराणी, आवंढी, शेगाव, येळदरी, गुगवाड, सोरडी, खैराव आदी गावांत दूषित पाणीपुरवठा होत आहे. निगडी बुद्रुक, हळ्ळी, उटगी, सोनलगी व उमदी या ठिकाणी पाणी शुद्ध करण्याची टीसीएल पावडरच निकृष्ट आढळली आहे.