नेमाडेंच्या शिफारशीमुळे चांगल्या लेखकांवर अन्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 11:04 PM2019-02-19T23:04:05+5:302019-02-19T23:04:10+5:30
इस्लामपूर : राज्यभरातील साहित्य संस्थांवर ताबा मिळविलेले नेमाडेंसारखे लोक पुरस्कारासाठी आपापल्या कंपूतील कवी, लेखकांची शिफारस करतात. त्यामुळे अनेकदा चांगल्या ...
इस्लामपूर : राज्यभरातील साहित्य संस्थांवर ताबा मिळविलेले नेमाडेंसारखे लोक पुरस्कारासाठी आपापल्या कंपूतील कवी, लेखकांची शिफारस करतात. त्यामुळे अनेकदा चांगल्या लेखकांवर अन्याय होतो, अशा शब्दात ज्येष्ठ कवी, समीक्षक मंगेश नारायणराव काळे यांनी नेमाडेंवर शरसंधान साधले.
देशभरात अमानवी अराजकाविरुध्द गोळ्या घालण्याची आणि पुरस्कार परत करण्याची लाट आली. मात्र त्याचवेळेस नेमाडेंनी स्वत:च्या ‘हिंदू’ पुस्तकावर नरेंद्र मोदींच्याहस्ते ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार स्वीकारतानाचे छायाचित्र प्रसिध्द केले. हे कशाचे लक्षण आहे? या काळे यांच्या वक्तव्याने साहित्य क्षेत्रात खळबळ उडाली.
राजारामबापू ज्ञानप्रबोधिनीच्या सभागृहात राजारामबापू पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ महाराष्ट्र साहित्य परिषदेची इस्लामपूर शाखा आणि राजारामबापू ज्ञानप्रबोधिनीच्यावतीने आयोजित २६ व्या मराठी साहित्य संमेलनात अध्यक्षस्थानावरुन काळे बोलत होते. प्रा. डॉ. संजय थोरात यांच्याहस्ते या संमेलनाचे उद्घाटन झाले. यावेळी प्रा. शामराव पाटील, डॉ. मंगल कोकाटे, बसापचे अध्यक्ष प्रा. प्रदीप पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
काळे म्हणाले, व्यवस्थेला शरण गेलेल्या लेखकांची टोळी आणि वाङ्मयीन राजकारणाने मराठी साहित्याची मोठी हानी झाली आहे. लिहिणाऱ्या प्रत्येकाला आपले लेखक असण्याचे प्रयोजन माहीत असले पाहिजे. लेखक म्हणून स्वत:ची ठाम भूमिका असली पाहिजे. आजुबाजूला जे जळते, त्याची धग कवी अथवा लेखकाने आपल्या लेखनातून व्यक्त केली पाहिजे. त्यामागील पिडा, वेदना आणि प्रतिरोध त्याने उभा केला पाहिजे. तरच आपण भाषेचे नागरिक म्हणून जगण्यास पात्र ठरतो.
काळे म्हणाले, आपल्याकडे अनुवाद होत नसल्याने क्षमता असूनही आपल्या लेखकांचे जगभर नाव होत नाही. साहित्य संस्थांवर ताबा ठेवत आपल्याच माणसांची वर्णी लावण्याच्या पध्दतीमुळे अरुण कोल्हटकर, बाबूराव बागुल, दिलीप चित्रे, नामदेव ढसाळ, विजय तेंडूलकर, दुर्गा भागवत, जी. ए. कुलकर्णी, दि. बा. मोकाशी, नारायण सुर्वे असे किती तरी लोक ‘ज्ञानपीठ’ पुरस्कारासाठी पात्र आहेत. पण त्यांना तो प्राप्त झाला नाही, याची खंत वाटते.
डॉ. थोरात म्हणाले, ग्रामीण आणि शहरी साहित्य संमेलनात गंभीर चर्चा होते, ही मराठी साहित्यासाठी चांगली गोष्ट आहे. अशा संमेलनांमुळे वाचन संस्कृती वाढेल. त्यासाठी ही संमेलने टिकायला हवीत.
डॉ. राजेंद्र माने (सातारा) यांना उत्कृष्ट साहित्य निर्मिती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, त्याबद्दल त्यांचा, शासनाच्या भाषा सल्लागार समितीवर सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल प्रा. वैजनाथ महाजन यांचा, शासनाचा व्यसनमुक्ती प्रचार सेवा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्जेराव कचरे यांचा, तर समीक्षेसाठी मसापचा पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ. विष्णू वासमकर, प्रा. बसवेश्वर स्वामी यांचा सत्कार करण्यात आला.
प्रा. प्रदीप पाटील यांनी स्वागत केले. प्रा. डॉ. सूरज चौगुले, प्रा. डॉ. दीपक स्वामी यांनी सूत्रसंचालन केले. सर्जेराव कचरे यांनी आभार मानले. यावेळी डॉ. भीमराव पाटील, वसंत पाटील, मनीषा पाटील, दशरथ पाटील, वृषाली आफळे, प्राचार्य डॉ. दीपा देशपांडे, शहानवाज मुल्ला, वैजयंती पेठकर, प्रा. दशरथ पाटील, प्रा. अरुण घोडके, प्रा. सुभाष खोत, प्रा. सुनील पाटील उपस्थित होते.
देशमुख यांना चिमटा
ते म्हणाले, आपल्या भावविश्वाला जे भिडते—डाचते, ते लिहिलेच पाहिजे. पण जेव्हा भोवतालात काही विपरित घडेल, माणूसपण वेठीला धरले जाईल, तेव्हा मात्र त्याने व्यवस्थेला प्रश्न विचारला पाहिजे. शासकीय सेवेत असताना ज्यांनी व्यवस्थेविषयी ब्र उच्चारला नाही, ते आता सेवेतून बाहेर पडल्यानंतर राजाच्या थाटात व्यवस्थेविरुध्द बोलत आहेत, अशा शब्दात माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांचा नामोल्लेख टाळून काळे यांनी चिमटा काढला.