‘वसंतदादा’च्या निविदेवरून खडाजंगी
By admin | Published: May 9, 2017 11:52 PM2017-05-09T23:52:48+5:302017-05-09T23:52:48+5:30
‘वसंतदादा’च्या निविदेवरून खडाजंगी
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : वसंतदादा साखर कारखान्याच्या निविदा प्रकरणावरून मंगळवारी जिल्हा बँकेच्या बैठकीत खडाजंगी झाली. कारखान्याच्या भाडेपट्ट्यातील अटी व शर्तींबाबत आक्षेप घेत निविदेबाबतचा फेरविचार करण्यात यावा, कारखान्यासाठी बँकेला अडचणीत आणू नये, असे संचालक बी. के. पाटील आणि प्रा. सिकंदर जमादार यांनी सुनावले. निविदा प्रक्रिया नियमानुसार राबविण्यात येत असल्याने नुकसान होणार नसल्याचे जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांनी स्पष्ट केले.
जिल्हा बँकेच्या कार्यकारी मंडळ आणि संचालक मंडळाची बैठक बँकेत झाली. त्यात वसंतदादा कारखान्याच्या भाडेपट्ट्याचा वाद पुन्हा उफाळून आला. कारखान्याकडे जिल्हा बँकेची ९३ कोटी रुपयांची थकबाकी आहे. थकीत कर्जापोटी बँकेने कारखाना ताब्यात घेऊन भाड्याने चालवण्यास देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. निविदा काढण्यापूर्वीच राजारामबापू साखर कारखान्यास वसंतदादासाठी निविदा भरण्यासाठी साकडे घालण्यात आले होते. शिवाय निविदेत खासगी कारखान्यांनाही सहभागी होता येईल, अशा अटी आणि
शर्ती घालण्यात आल्या आहेत. त्यामुळे निविदा उघडण्यापूर्वी जिल्हा बँकेच्या संचालकांमध्ये मतभेद निर्माण झाले
आहेत.
आशिया खंडात एकेकाळी आघाडीवर असलेला कारखाना भाड्याने घेण्यासाठी जाचक अटी असायला हव्या होत्या. मात्र, त्याकडे बँकेने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. को-जनरेशन, इथेनॉल निर्मिती, मद्यार्क निर्मिती याबाबतच्या अटी असणे आवश्यक होते. निविदेसाठी किमान दहा वर्षांची मुदत देण्यात आली आहे, त्यामुळे राजारामबापू कारखान्याला वाळव्याच्या हुतात्मा कारखान्यासह चार खासगी कारखाने स्पर्धक निर्माण झाले आहेत. याबद्दल आ. जयंत पाटील यांनी दोन संचालकांपुढे नाराजी व्यक्त केली होती. बँकेचे संचालक बी. के. पाटील आणि प्रा. जमादार यांच्याशी त्यांनी चर्चा केली होती. जयंतरावांच्या सूचनेनुसार पाटील आणि प्रा. जमादार यांनी निविदा प्रक्रियेत विश्वासात घेतले नसल्याची तक्रार बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील आणि मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एम. रामदुर्ग यांच्याकडे केली होती. त्यानंतर मंगळवारी पुन्हा संचालक मंडळाच्या बैठकीत वसंतदादा कारखान्याच्या निविदेवरून खडाजंगी झाली. राजारामबापू कारखान्याच्या ताब्यात वसंतदादा कारखाना जाऊ नये, तसेच खासगी कारखान्यास निविदा प्रक्रियेत सहभागी होता यावे, याबाबतची दक्षता घेऊन अटी व शर्ती तयार करण्यात आल्या असल्याचा आरोप बैठकीत करण्यात आला.
बँकेने वसंतदादा कारखान्याच्या निविदेबाबत फेरविचार करण्याची गरज आहे. कारखाना चालवायला दिल्यानंतर बँकेची देणी मिळणार आहेत का, असा सवाल उपस्थित करून, बँकेला अडचणीत आणू नये, असे बी. के. पाटील आणि प्रा. जमादार यांनी बजावले.
त्यावर अध्यक्ष पाटील म्हणाले की, जिल्हा बँकेने वसंतदादा साखर कारखाना भाडेपट्ट्याने देण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, नकाशा, तसेच कायदेशीर प्रक्रिया राबवली आहे. त्यासाठी कोल्हापूर येथील तज्ज्ञांकडून कायदेशीर अभिप्राय घेतला आहे. सिक्युरिटायझेशन अॅक्टखाली जिल्हा बँकेकडून ही कारवाई होणार आहे. त्यासाठी बँकेने संचालक मंडळाच्या निर्णयानुसार सरव्यवस्थापक मानसिंग पाटील यांची प्राधिकरण अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. वसंतदादा कारखान्यासाठी स्वतंत्र प्राधिकृत अधिकारी असल्याने अध्यक्ष, संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा संबंध येत नाही. निविदेबाबतच्या अटी आणि शर्ती तयार करण्याची जबाबदारी प्राधिकृत अधिकाऱ्यांची आहे.