वाळू तस्करीमुळे आटपाडी समस्यांच्या गर्तेत
By admin | Published: August 29, 2016 11:01 PM2016-08-29T23:01:12+5:302016-08-29T23:13:44+5:30
पाणी समस्या तीव्र : प्रशासनाकडून कारवाई नाही; झिरो तलाठी, वसुलीबहाद्दर कर्मचारी मालामाल
अविनाश बाड -- आटपाडी --माणगंगा नदीसह तालुक्यातील सर्व गावांच्या ओढ्यांतून सध्या अहोरात्र वाळू तस्करी सुरू आहे. झिरो तलाठी आणि काही वसुलीबहाद्दर कर्मचारी मालामाल होत आहेत. मात्र आधीच दुष्काळी परिस्थितीला वारंवार सामोऱ्या जाणाऱ्या या तालुक्यातील पर्यावरणाचे कधीही भरून न येणारे नुकसान होत आहे. महसूल विभागाने वाळू तस्करांवर कठोर कारवाई करुन वाळू तस्करी पूर्णपणे बंद करण्याची मागणी होत आहे.
आटपाडी तालुक्यात आतापर्यंत आटपाडीत ३०७ मि.मी., दिघंचीत २४७ मि.मी. आणि खरसुंडीत २०२ मि.मी. एवढा पाऊस झाल्याची नोंद असली तरी, अत्यंत विरळ पडलेल्या पावसाने तालुक्यातील एकाही ओढ्याला पाणी आलेले नाही. तालुक्यातील सर्व ओढे आणि माणगंगा नदी कोरडी आहे. अशा या नैसर्गिक आपत्तीत वाळू तस्करांची मात्र चांदी होत आहे. वाळू तस्कर गावा-गावातील ओढे लक्ष्य बनवित आहेत. आटपाडीत आतापर्यंत काही ठराविक स्वयंघोषित दादांची वाळू तस्करी सुरु होती. पण तालुक्यातील गावा-गावात आता तात्काळ पैसे मिळवून देणाऱ्या वाळू तस्करीत अनेक तरुण गुंतले आहेत. रात्रभर ओढ्यातील वाळू चाळून ट्रॅक्टरमध्ये भरुन सुरक्षित ठिकाणी या वाळूचे ‘डेपो’ केले जात आहेत. हे वाळूसाठे नंतर मोठ्या डंपरमध्ये जेसीबीने भरुन वाळू तालुक्याबाहेर पाठविली जात आहे. काही दिवसांपूर्वी सायकलीवरुन फिरणाऱ्यांना आता वाळू तस्करीमुळे लाखो रुपयांच्या अलिशान गाड्या बहाल केल्या आहेत.
महसूल विभागाच्यावतीने वाळू तस्करांवर वारंवार कारवाई केली जाते. आटपाडी तहसील कार्यालयासमोर कायम वाळू तस्करी करणारे ट्रॅक्टर, ट्रक उभे केलेले असतात. मात्र वाळू तस्करी पूर्णपणे बंद होताना दिसून येत नाही. एका बाजूला तालुक्यात कुठेच वाळू उपशाला परवानगी नसताना, तालुक्यात शेकडो बांधकामे होताना दिसतात. या दुष्काळी तालुक्यात वर्षातून एकही पीक नीट येत नसताना, शेकडो ट्रॅक्टर कशासाठी खरेदी केले जातात? आणि ‘तिबल सीट’ दुचाकीवर दंडात्मक कारवाई करणाऱ्या पोलिसांसह दरमहा आटपाडीत येणाऱ्या एका ‘आरटीओ’ना विनानंबरचे शेकडो ट्रॅक्टर कसे काय दिसत नाहीत? असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे.
महसूल विभागाच्यावतीने अनेक ट्रॅक्टर आणि ट्रॉल्या या विनानंबरच्या पकडल्या गेल्या आहेत. कारवाई झाली असली तरी, वाळू तस्करी काही थांबलेली नाही. यातून महसूल तर बुडतोच आहे, पण वाळू तस्करीमुळे गावोगावच्या ओढ्यांना आधीच पर्जन्यमान कमी असल्यामुळे पाण्याचा तुटवडा जाणवत आहे. त्यातच वाळू तस्करीमुळे पाण्याची समस्याही निर्माण झाली आहे.
यामुळे परिसरात पाण्याचा तुटवडा जाणवत आहे. वाळू तस्करांकडून मासिक भेट गोळा करणारे काहीजण येथीलच असल्याची चर्चा आहे. त्यामुळे वाळू तस्करी कशी आणि कधी पूर्णपणे बंद होणार, हा प्रश्न येथील शेतकऱ्यांनी उपस्थित केला जात आहे.
वाळू तस्करांना पाठीशी घालणारे शत्रूच
वाळू तस्करीमुळे गावोगावी किरकोळ आणि मारामारीच्या स्वरुपात सतत भांडणे होत आहेत. वाळू तस्करीतून पैसा कमविणारे वाळू तस्कर, त्यांना अभय देणारे कर्मचारी आणि पाठीशी घालणारे काही पुढारी हे सर्वजण तालुक्याचे खरे शत्रू आहेत. उघड्या डोळ्यांनी समाजातील सर्व घटक या दुष्काळी तालुक्याची, तसेच पर्यावरणाची होणारी हानी पाहत आहेत. ग्रामस्थ लिलावाला विरोध करीत आहेत. लिलाव दिला तर खडकापर्यंत वाळू बेकायदेशीररित्या नेत आहेत आणि लिलाव झाला नाही, तर अहोरात्र वाळू चोरून नेत आहेत. त्यामुळे भविष्यात या दुष्काळी भागातील चित्र चिंताजनक होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.