पाऊस, कोरोनामुळे नेटकऱ्यांना आली फडणवीसांच्या 'त्या' घोषणेची आठवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2021 07:04 PM2021-12-02T19:04:40+5:302021-12-02T19:05:43+5:30
एकाचवेळी कोरोनाची अन् पावसाची भीती नागरिकांना सतावत असताना नेटकऱ्यांना अचानक देवेंद्र फडणवीस यांच्या 'त्या' घोषणेची आठवण आली. इतकचं नाही तर नेटकऱ्यांनी त्यावर चक्क कविता केली. ती सध्या तुफान व्हायरल होत आहे.
सांगली : एकाचवेळी कोरोनाची अन् पावसाची भीती नागरिकांना सतावत असताना नेटकऱ्यांना अचानक माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची आठवण आली. या दोन्ही मुद्यांवर त्यांच्या प्रसिद्ध घोषणेवरुन नेटकऱ्यांनी चक्क कविता केली. ती सध्या तुफान व्हायरल होत आहे. या कवितेने गेल्या दोन दिवसांत हजारो लोकांचे मनोरंजन केले असून त्यावरील प्रतिक्रियाही मजेशीर आहेत.
दोन वर्षापूर्वी विधानसभा निवडणुकीपूर्वी एका प्रचार सभेत फडणवीस यांनी ‘मी पुन्हा येईन’ अशी घोषणा केली होती. राजकीय वर्तुळात ही घोषणा खूप गाजली. सत्ताबदल झाल्यानंतरही त्यांच्या घोषणेची खिल्ली उडविण्यात आली होती, मात्र सातत्याने त्यांची ही घोषणा चर्चेत राहिली.
कोरोनाची संभाव्य तिसरी लाट व हिवाळ्यात बरसणारा पाऊस पाहून नेटकऱ्यांना पुन्हा फडणवीस यांच्या ‘मी पुन्हा येईन’ या घोषणेची आठवण झाली आणि त्यांच्या चक्क काव्य रचण्यात आले. हे काव्य इतके भन्नाट झाले असून ते तुफान व्हायरल होत आहे. या कवितेतील कल्पकता सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.
छत्री ठेवून स्वेटर काढला,
पाऊस म्हणाला मी पुन्हा येईन...
मोबाईल ठेऊन दप्तर काढलं,
करोना म्हणाला मी पुन्हा येईन...
दोन व्हॅक्सीनचं सर्टिफिकेट घेतलं,
बुस्टर म्हणाला मी पुन्हा येईन...
नविन दुकान भाड्याने घेतलं,
लॉकडाऊन म्हणाला मी पुन्हा येईन...
मी पुन्हा येईन...
मी पुन्हा येईन...
मी पुन्हा येईन...