पावसामुळे सांगली खड्ड्यांत, उपनगरे चिखलात
By admin | Published: July 4, 2016 12:21 AM2016-07-04T00:21:46+5:302016-07-04T00:21:46+5:30
नागरिक बेहाल : महापालिकेचे नियोजन कोलमडले; गुंठेवारी भागात दलदल, मुरूमाचा पत्ताच नाही
सांगली : गेल्या चार दिवसांपासून सांगली शहर व परिसरात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. या पावसामुळे सांगली व कुपवाडमधील रस्ते खड्ड्यात गेले आहेत. विस्तारित व उपनगरांमध्ये ड्रेनेज व इतर कामासाठी रस्ते खोदले आहेत. त्यात पावसाळ्यापूर्वी मुरूम, पॅचवर्क व चरी भरण्याच्या कामाचे नियोजन प्रशासनाने करण्याची गरज होती. पण लाल फितीच्या कारभारामुळे या कामासाठी काढलेली साडेतीन कोटीची निविदा आयुक्तांच्या टेबलावरच धूळ खात पडली आहे. शहरातील रस्ते खड्ड्यांत आणि उपनगरे चिखलात रुतली आहेत.
जुलै महिन्याच्या सुरूवातीलाच सांगली व परिसरात संततधार पावसाने हजेरी लावली. अधूनमधून पडणारी संततधार असली तरी, मुसळधार पावसाने अद्याप हजेरी लावलेली नाही. पहिल्या चार दिवसांतील पावसानेच सांगलीतील नागरिकांची अवस्था बेहाल केली आहे. शहराच्या विस्तारित भागात ड्रेनेजचे काम सुरू आहे. शामरावनगर, विनायकनगर परिसरात चरीतील माती रस्त्याकडेला पडली आहे. त्यातून उपनगरांतील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात दलदल झाली आहे. मध्यंतरी आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी या परिसराची पाहणी करून काही उपाययोजना सुचविल्या होत्या. पण त्यांनी नागरिकांना दिलेले आश्वासन हवेतच विरले आहे. केवळ शामरावनगरकडून झुलेलाल मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर मुरूम टाकण्यात आला. आता हा मुरूमही चिखलात रुतला आहे. शामरावनगर, गव्हर्न्मेंट कॉलनी, श्रीरामनगर, कोल्हापूर रोड, आकाशवाणी परिसर चिखलमय झाला आहे. अनेक मोकळ्या प्लॉटमध्ये पाणी साचले आहे. डुकरांचा त्रास कायमच आहे. डुकरे पकडून ती मारण्याची केवळ घोषणाच झाली आहे. प्रत्यक्षात कार्यवाही धिम्या गतीने सुरू असल्याचे दिसून येते. कुपवाड शहरातील रामकृष्णनगर, हमालवाडी, श्रीमंती कॉलनी, साईनगर परिसरातील नागरिकांनाही चिखलातून वाट शोधावी लागत आहे.
उपनगरे चिखलात रुतली असताना, शहरातील प्रमुख रस्त्यांची चाळण झाली आहे. सांगली बसस्थानक ते महापालिका मुख्यालयापर्यंतच्या रस्त्यावर दोनशेहून अधिक खड्डे आहेत. रहदारीच्यादृष्टीने सर्वात महत्त्वाचा हा रस्ताच खड्ड्यात गेला आहे. महापालिका मुख्यालयाजवळील प्रतापसिंह उद्यानासमोर खड्डेच खड्डे आहेत. पण त्याकडे लक्ष देण्यास प्रशासनाला वेळ नाही. विश्रामबाग ते लक्ष्मी देऊळ या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. हे खड्डे चुकविताना अपघातही होत आहेत. अशीच स्थिती आलदार चौक ते स्फूर्ती चौकापर्यंतच्या रस्त्याची आहे. कुपवाडमधील उल्हासनगर बसस्थानक ते जकात नाका हा रस्ता तर खड्ड्यातच गेला आहे.
वर्षभरात ज्या रस्त्यांचे डांबरीकरण होऊ शकले नाही, त्या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. हसनी आश्रम चौक ते कुंभार मळा हा रस्ता नव्याने करण्यात आला होता. आता ऐन पावसाळ्यात या रस्त्यावर केबल खुदाईला परवानगी देण्यात आली. परिणामी पुन्हा या रस्त्याची वाट लागली आहे. पावसाळ्याच्या तोंडावर प्रशासनाने पॅचवर्क, मुरूम व चरी भरण्यासाठी नियोजन करण्याची आवश्यकता होती. त्यादृष्टीने साडेतीन कोटीच्या निविदा काढण्यात आल्या. पण प्रशासनाच्या लाल फितीच्या कारभारामुळे निविदा प्रक्रिया रखडली आहे. प्रशासन व पदाधिकाऱ्यांच्या वादात नागरिकांना मात्र नरकयातना भोगाव्या लागणार आहेत. (प्रतिनिधी)
मुरूम, पॅचवर्कची मागणी
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन आयुक्त अजिज कारचे व स्थायी समिती सभापती संतोष पाटील यांनी तोंडी सूचना देऊन पॅचवर्क, चरी भरणे व मुरूमासाठी साडेतीन कोटीच्या निविदा काढल्या. पण ही प्रक्रिया राबविताना निविदा प्रक्रियेला आयुक्तांची मान्यता घेतली नाही. कारचे यांनी मान्यता देण्याच्या अटीवरच ही प्रक्रिया राबविण्यात आली. पण याच कालावधित कारचे यांची बदली होऊन रवींद्र खेबूडकर आयुक्त म्हणून आले. त्यांनी मान्यतेविना निविदा काढल्याचे कारण पुढे करीत निविदा उघडण्यास मज्जाव केला. मुरूम, पॅचवर्कच्या कामात गोलमाल होतो, असा प्रशासनाचा समज असू शकतो. पण कामावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी प्रशासनाचीच आहे. त्यामुळे ठेकेदार योग्यरित्या काम करतो की नाही, यावर खुद्द आयुक्तांनी देखरेख ठेवावी. पण तातडीने मुरूम व पॅचवर्कच्या कामाला सुरुवात करावी, अशी मागणी नगरसेवकांतून होत आहे.