आवक वाढल्याने बेदाण्याच्या दरात घसरण -: दुष्काळात शेतकऱ्यांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 07:42 PM2019-06-20T19:42:21+5:302019-06-20T19:46:49+5:30
बाजारात बेदाण्याची आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने दर कमी झाला आहे. सध्या १२५ ते १७० रुपये इतका दर मिळत आहे. यामुळे ‘दुष्काळात धोंडा महिना’ अशी शेतकऱ्यांची स्थिती झाली आहे.
गजानन पाटील
संख (जि. सांगली) : बाजारात बेदाण्याची आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने दर कमी झाला आहे. सध्या १२५ ते १७० रुपये इतका दर मिळत आहे. यामुळे ‘दुष्काळात धोंडा महिना’ अशी शेतकऱ्यांची स्थिती झाली आहे. पाण्यासाठी करण्यात आलेला खर्च, मशागतीचा खर्च, कोल्ड स्टोअरेजचे भाडे वजा जाता द्राक्ष उत्पादकाच्या पदरात काहीच पडत नाही.
यावर्षी बेदाण्याला चांगला दर मिळेल, अशी आशा शेतकरी बाळगून होता. उत्पादन वाढले, मात्र गेल्या तीन महिन्यांपासून बेदाण्याच्या दारात सातत्याने घसरण होत असल्याने तालुक्यातील द्राक्ष उत्पादक आर्थिक संकटात सापडला आहे. यंदाच्या द्राक्ष हंगामात चांगले वातावरण होते. त्यामुळे बेदाणा उत्पादनात वाढ झाली आहे. राज्यात यंदा तीस हजार टनाने बेदाण्याचे उत्पादन वाढले आहे. वाढलेले उत्पादन दर कमी होण्यास कारणीभूत असल्याची चर्चा आहे. सुरुवातीला बेदाण्याचा दर २५० रुपये प्रतिकिलो होता. त्यानंतर हळूहळू बेदाण्याची आवक वाढली. त्याचा परिणाम दरावर झाला आहे.
दर नसल्याने शीतगृहात ठेवलेला बेदाणा विक्रीस काढण्यास शेतकरी तयार नाहीत. आता येणाºया गणपती, दसरा, दिवाळी या सणांवरच बेदाण्याचे दर अवलंबून आहेत. त्यामुळे दरासाठी या सणांपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
दोन महिन्यात तीस रुपयांपर्यंत दर कमी
बेदाण्याचे दर एप्रिल-मेमध्ये सरासरी प्रतिकिलोस २०० ते २२५ रुपये दर होता, परंतु हळूहळू मागणी कमी होईल तसा दर कमी झाला. तो १७० रुपयांवर आला. राज्यात यंदा १ लाख ९० हजार टन बेदाणा उत्पादन झाले असून गेल्यावर्षापेक्षा ३० हजार टन उत्पादनात वाढ झाली आहे.
बेदाण्याचे दर प्रतिकिलो
सध्याचा दर मागील दर
हिरवा बेदाणा १२५ ते १७० २१० ते २२०
पिवळा बेदाणा १२० ते १६० १६० ते २१०
काळा बेदाणा ६५ ते ८० १०० ते ११०
बेदाणा दरावर दृष्टिक्षेप
* चांगल्या दर्जाच्या बेदाण्यास १५० ते १९० रुपये प्रति किलो दर
* आजपर्यंत ३० ते ३५ टक्के बेदाण्याची विक्री
* जिल्'ातील शीतगृहात ६५ ते ७० टक्के बेदाणा शिल्लक
बेदाण्याचे दर कमी होत आहेत. परंतु गणपती, दसरा व दिवाळी या सणाला दर वाढतील, अशी आशा आहे. कोल्ड स्टोअरेजचा दर, महिन्याचा खर्च, पाण्यासाठी टँकरवर केलेला खर्च, वॉशिंग, प्रतवारीचा खर्च, बेदाणा निर्मितीचा खर्च, औषधे, रासायनिक खते, मशागतीचा खर्च वजा जाता सध्याचा दर अजिबात परवडत नाही. परंतु द्राक्ष हंगामाचा खर्च करण्यासाठी बेदाणा विकण्याशिवाय पर्याय नाही.
-कामाण्णा पाटील, द्राक्षबागायतदार