सांगली जिल्ह्यात ‘एड्स’ रुग्णांचे प्रमाण घटले, : विविध स्तरावरील जनजागृतीला यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 12:11 AM2017-12-01T00:11:05+5:302017-12-01T00:12:54+5:30
सचिन लाड ।
सांगली : एचआयव्ही एड्सला टाळू शकतो, लैंगिक संबंध ठेवताना योग्य ती काळजी घ्यावी, कंडोमचा वापर करावा, अशी जनजागृती मोठ्या प्रमाणावर झाल्याने गेल्या सहा वर्षात जिल्ह्यात एड्सच्या रुग्णांचे प्रमाण घटले आहे. गेल्या सहा वर्षात याचे नऊ हजार १२५ रुग्ण आढळून आले आहेत.
पण २०१२ पासून प्रत्येकवर्षी लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत कमालीची घट झाली असल्याचे आकडेवारीवरुन दिसून येते.शासनाने विविध उपाययोजना व जनजागृती कार्यक्रम प्रभावीपणे राबविल्यामुळे जिल्ह्यात एड्स रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे.
जिल्ह्यात चार सेंटर
एचआयव्ही झालेल्या रुग्णांवर शासनाकडून मोफत औषधोपचार केले जात आहेत. यासाठी जिल्ह्यात चार एआरटी सेंटर सुरू आहेत. यामध्ये सांगली, मिरजेत दोन शासकीय रुग्णालय, इस्लामपूरचे उपजिल्हा रुग्णालय व सांगलीतील भारती मेडिकल कॉलेजचा समावेश आहे.
मोफत तपासणी
शासकीय रुग्णालयात मोफत एचआयव्ही तपासणीची सोय आहे. रुग्णाच्या संमतीने ही तपासणी केली जाते. मोफत समुपदेशनही केले जाते. तपासणीचा अहवाल गोपनीय ठेवला जातो. दररोज तपासणीसाठी गर्दी असते.