संघर्षाच्या लाटांमुळे जिल्ह्यात भाजपच्या नौकेला हेलकावे

By admin | Published: October 18, 2016 11:12 PM2016-10-18T23:12:58+5:302016-10-18T23:12:58+5:30

नेत्यांमध्ये धुसफूस : व्यक्तिगत हेवेदावे ऐरणीवर

Due to the storm of struggle, BJP's boat flown in the district | संघर्षाच्या लाटांमुळे जिल्ह्यात भाजपच्या नौकेला हेलकावे

संघर्षाच्या लाटांमुळे जिल्ह्यात भाजपच्या नौकेला हेलकावे

Next

सांगली : ऐन दिवाळीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असतानाच, भाजपमध्ये संघर्षाचे फटाके फुटू लागले आहेत. एक खासदार आणि चार आमदारांमुळे जिल्ह्यातील सर्वात मोठा पक्ष बनलेल्या भाजपला विरोधी पक्षांऐवजी स्वकीयांच्या छुप्या कुरघोड्यांचाच सामना करावा लागणार आहे.
गेल्या वर्षभरात जिल्ह्यात भाजप नेत्यांमधील धुसफूस कमालीची टोकाला गेली आहे. यातूनच एकमेकांना धडा शिकविण्यासाठी विरोधी पक्षांतील नेत्यांशी छुपी हातमिळवणी करण्याचे प्रकारही सुरू झाले आहेत. नेत्यांमध्ये नसलेली एकवाक्यता, उघडपणे पुकारलेला संघर्ष, पक्षीय बैठकांमधील हजेरीची औपचारिकता, गटा-गटात विभागलेली ताकद यामुळे भाजपची प्रकृती ऐन निवडणुकीतच बिघडली आहे. तासगाव, इस्लामपूर, आष्टा, विटा आणि पलूस या महत्त्वाच्या नगरपालिका आहेत. यातील केवळ तासगाव पालिकेत भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांची सत्ता आहे. अन्य नगरपालिका राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या ताब्यात आहेत. नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या माध्यमातून पक्षीय ताकद वाढविण्याचे भाजप प्रदेश कार्यकारिणीचे मनसुबे, अंतर्गत संघर्षामुळे अयशस्वी होण्याची चिन्हे दिसत आहेत.
भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख आणि खासदार संजय पाटील यांच्यातील संघर्ष राज्याच्या वेशीवर टांगला गेला आहे. कार्यक्रमांमधून एकत्र येण्याची औपचारिकता ते पार पाडत असले तरी, त्यांच्यातील धुसफूस कायम आहे. कवठेमहांकाळमध्ये कधीकाळी एकमेकांचे मित्र असलेले संजयकाका आणि माजी मंत्री अजितराव घोरपडेही आता एकमेकांपासून दूर गेले आहेत. तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात दोघांनीही वेगळ्या चुली मांडल्या आहेत. बऱ्याचदा एकमेकांना शह देण्याचा प्रयत्नही केला गेला. अजूनही या दोन्ही नेत्यांचे सूर जुळलेले नाहीत. भाजपचे नेते गोपीचंद पडळकर आणि संजयकाकांमध्येही आता सख्य राहिलेले नाही. आटपाडीतील एका कार्यक्रमात संजयकाका आणि पडळकरांच्या संघर्षाचे साक्षीदार होण्याची वेळ महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर आली होती. त्यांनी या गोष्टीवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला असला तरी, त्यांच्या क्षणिक प्रयत्नांमुळे काहीही फरक पडला नाही.
भाजपच्या नुकत्याच झालेल्या सांगलीतील बैठकीत निवडणुकांसाठीचे रणशिंग जिल्ह्यातील नेत्यांनी फुंकले. स्वबळावर तसेच एकसंधपणे लढण्याचा निर्धारही व्यक्त केला. प्रत्यक्षात गटा-गटात विभागल्या गेलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांची फौज एकसंधपणे कशी काम करणार?, हा प्रश्न जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना पडला आहे. त्यामुळे नगरपालिकांची लिटमस टेस्ट घेऊन पक्षाची जिल्ह्यातील ताकद स्पष्ट होईल, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)


नेत्यांच्या आदेशाला कोलदांडा
आपसातील मतभेद विसरून पक्षीय ताकद वाढविण्यासाठी कामाला लागण्याचे आदेश भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीने यापूर्वीच येथील नेत्यांना दिले आहेत. भाजप नेत्यांनी त्यानंतर केवळ कार्यक्रमांना एकत्रित हजेरी लावून, आदेशाचे पालन होत असल्याचे चित्र निर्माण केले. प्रत्यक्षात नेत्यांच्या कार्यकर्त्यांचे गट अजूनही एकमेकांविरोधातच काम करीत आहेत.
भाजप नेत्यांना बाहेरील रसद
भाजपमधील संघर्षाचा विस्तव जागृत ठेवण्यासाठी विरोधी पक्षातील नेत्यांनी त्यावर फुंकर घालण्याचे काम सुरू केले आहे. विशेषत: खासदार संजय पाटील यांच्याविरोधात भाजपसह राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेतील काही नेत्यांनी मोट बांधण्याची छुपी खेळी सुरू केली आहे.

Web Title: Due to the storm of struggle, BJP's boat flown in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.