पोलिसांच्या कठोर पवित्र्यामुळेच मिरजेत डॉल्बीमुक्त गणेशोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 12:05 AM2017-09-08T00:05:32+5:302017-09-08T00:07:29+5:30
मिरज : जिल्ह्यात ख्याती असलेल्या मिरजेतील गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांबाबत कार्यकर्त्यांनी आग्रह धरला होता, मात्र कायद्याच्या कक्षेत राहूनच वाद्ये वाजवता येतील,
मिरज : जिल्ह्यात ख्याती असलेल्या मिरजेतील गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांबाबत कार्यकर्त्यांनी आग्रह धरला होता, मात्र कायद्याच्या कक्षेत राहूनच वाद्ये वाजवता येतील, डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा होईल, असा कठोर पवित्रा पोलिसांनी घेतल्याने मिरजेतील गणेश विसर्जन मिरवणूक डॉल्बीमुक्त वातावरणात शांततेत पार पडली.
मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा होणाºया मिरजेतील गणेश विसर्जन मिरवणुकीची जिल्ह्यात ख्याती आहे. रात्री दहानंतर ध्वनिक्षेपक व वाद्यांना न्यायालयाचा प्रतिबंध असल्याने गणेश विसर्जन मिरवणुकीत रात्रभर पारंपरिक वाद्यांना परवानगी देण्याची मागणी गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची होती. गेली दहा वर्षे या मागणीबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याने, सर्वपक्षीय गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी यावर्षी एकत्र येऊन गणेशोत्सव समितीची स्थापना करून, पारंपरिक वाद्यांना परवानगीसाठी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन, विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांना परवानगी देण्याची मागणी केली. खा. संजय पाटील, आ. जयंत पाटील, आ. सुरेश खाडे, आ. सुधीर गाडगीळ तसेच समितीच्या कार्यकर्त्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे, मिरजेतील गणेश विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांच्या वापरासह मिरवणूक संपेपर्यंत वाद्ये सुरू ठेवण्याची मागणी होती.
बॅन्ड, बेंजो व ढोल ही वाद्ये परवडत नसल्याने एक बेस व एक टॉप असलेल्या ध्वनिक्षेपकाला परवानगी देण्याचीही मागणी करण्यात आली. आ. जयंत पाटील यांनी, गणेशोत्सवात पोलिसांकडून कार्यकर्त्यांना टार्गेट करुन त्यांना नोटिसा देणे, बोगस गुन्हे दाखल होणे, प्रतिबंधात्मक कारवाई, हद्दपारीची कारवाई थांबविण्याची मागणी केली. मात्र पोलिस व प्रशासनाने समितीचा दबाव झुगारत कायद्याच्या कक्षेत राहूनच वाद्यांचा वापर करता येईल, अशी भूमिका घेत गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या.
पोलिस, जिल्हा प्रशासनाच्या उपाययोजना
मिरजेत पोलिसांनी सर्व गणेश मंडळे, डॉल्बीधारक, मूर्तिकार, मंडपवाले, शांतता समिती सदस्य, मोहल्ला कमिटी सदस्य, डिजिटल फलक मुद्रण करणारे, कमानी, स्वागत कक्ष उभारणारे, लॉज मालक, मूर्ती विसर्जन करणारे, शाळा, महाविद्यालयांचे विद्यार्थी, मुल्ला-मौलवी, मांस विक्रेते यांच्या बैठका घेऊन त्यांना आवश्यक सूचना दिल्या. मिरवणूक मार्गावर व स्वागत कमानींवर सीसीटीव्ही कॅमेºयांची व्यवस्था करीत शहरातील संवेदनशील ठिकाणी २४ तास पोलिस बंदोबस्त ठेवला होता. मिरज शहर व ग्रामीण भागात विविध गावांत पोलिसांनी संचलन केले. समितीच्या पदाधिकाºयांची बैठक घेऊन त्यांना सूचना दिल्या. जिल्हाधिकाºयांनी डॉल्बी यंत्रणा सीलबंद करण्याचे आदेश दिले. पोलिस व प्रशासनाच्या या उपाययोजनांमुळे मिरजेत डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा झाला.
राजकारण्यांचा रस...
गणेशोत्सव समितीत भाजपसह राष्टÑवादी, शिवसेना व सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा समावेश होता. मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्यासाठी आ. जयंत पाटील यांनी पुढाकार घेतला होता. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना खूश करण्यासाठी सुरू असलेल्या समितीच्या राजकारणापासून आ. सुरेश खाडे काहीसे अंतर राखून होते. विसर्जन मिरवणुकीत टाळ, मृदंग, ताशा, लेझीम अशी कमी आवाजाची पारंपरिक वाद्ये रात्रभर वाजविण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी कोणताही निर्णय न देता, चेंडू जिल्हा प्रशासनाकडे टोलवला होता.
एक बेस, एक टॉप
पोलिसांनी समितीच्या दबावाला झुगारत विसर्जन मिरवणुकीत रात्रभर टाळ मृदंग, ताशा, लेझीम अशा वाद्यांनाही परवानगी नाकारली. मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी कार्यकर्त्यांवर प्रतिबंधात्मक व प्रवेशबंदीची कारवाई केली. रात्रभर देखाव्यांना परवानगी मिळाली नाही. विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत वाद्ये वाजविता आली. डॉल्बीऐवजी एक बेस व एका टॉपचा वापर करता आला.