विद्यार्थ्यांची कडक निर्बंधामुळे फरपट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:17 AM2021-07-19T04:17:59+5:302021-07-19T04:17:59+5:30
सांगली : कोरोनाचा संसर्ग वाढल्याने जिल्ह्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. या निर्बंधांचा फटका महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बसत आहे. नेटकॅफे ...
सांगली : कोरोनाचा संसर्ग वाढल्याने जिल्ह्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. या निर्बंधांचा फटका महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बसत आहे. नेटकॅफे बंद असल्यामुळे सध्या अभियांत्रिकी, नीटसह विविध प्रवेशासाठी अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांची फरपट होत आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी झालेला नाही. त्यामुळे प्रशासनाकडून कडक निर्बंध लागू केले आहेत. यातून जिल्ह्यातील नेटकॅफेही सुटलेले नाहीत. त्यात दहावीचा निकाल जाहीर झाला तर बारावीचा निकाल प्रतीक्षेत आहे. दहावीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांचा ओढा डिप्लोमाकडे अधिक आहे. पंधरा दिवसांपूर्वीच डिप्लोमासाठी अर्ज भरण्यास सुरूवात झाली. पण नेटकॅफे बंद असल्याने अनेकांनी घरातून अर्ज भरले तर अनेकांना प्रवेश प्रक्रियेची माहिती नसल्याने ते नेटकॅफे सुरू होण्याची वाट पाहत आहेत. त्यात बारावीनंतरच्या सात ते आठ विभागांच्या प्रवेशासाठीही ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरूवात झाली आहे. सीईटीचे अर्ज ऑनलाईन भरले जात आहेत. पुढील आठवड्यात नीटचे अर्ज भरण्यास सुरूवात होणार आहे.
शहरासह ग्रामीण भागातील नेटकॅफे बंद आहेत. त्यामुळे ऑनलाईन प्रवेश भर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालकांची फरपट होत आहे. मोबाईलवरून अर्ज भरताना अनेक चुका होत आहेत. तसेच वेळेत प्रवेश अर्ज भरला जाईल की नाही, याची चिंता पालकांनाही लागली आहे. नियमांचे पालन करून नेटकॅफे सुरू करण्यासाठी प्रशासनाने परवानगी द्यावी, अशी मागणी या चालकांकडून होत आहे.