साखरेच्या अधिभारामुळे सोळा कारखान्यांना भुर्दंड
By admin | Published: February 3, 2016 12:31 AM2016-02-03T00:31:40+5:302016-02-03T00:31:40+5:30
जिल्ह्यातील स्थिती : महसुलात शंभर कोटी वाढ होणार; कारखानदारांत नाराजीचा सूर
मिरज : साखरेवर प्रतिक्विंटल शंभर रुपये अधिभारामुळे जिल्ह्यातील १६ कारखान्यांकडून दरवर्षी शंभर कोटी रुपये जादा महसूल केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाला मिळणार आहे. अधिभारानंतरही साखरेचे दर स्थिर असल्याने साखर कारखान्यांना अधिभाराचा भुर्दंड बसणार आहे. त्याबाबत नाराजीचा सूर उमटत आहे.
साखरेला दर नसल्याने कारखाने आर्थिक अडचणीत असताना, केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्रालयाने साखर विकास निधीत प्रतिक्विंटल १०० रुपये वाढ केली आहे. यामुळे साखर कारखान्यातून विक्री होणाऱ्या साखरेवर प्रतिक्विंटल २४ रुपयेऐवजी १२४ रुपये सेस व ७१ रुपये अबकारी कर वसूल होणार आहे.
सांगली जिल्ह्यात दरवर्षी एक कोटी टन साखर उत्पादन होते. त्यापासून सुमारे १८ कोटी सेस वसुली होते. आता सेसमध्ये तब्बल शंभर रुपयांनी वाढ झाली असल्याने, कर वसुलीत पाचपट वाढ होणार आहे. सांगली जिल्ह्यातील १७पैकी एक कारखाना बंद असून १६ कारखान्यांत गतवर्षी ९९ लाख २४ हजार ७१७ क्विंटल साखर उत्पादन झाले होते. त्यापैकी ७५ लाख हजार क्विंटल साखरेची विक्री होऊन त्यापासून १८ कोटी २९ लाख ३६ हजार रुपये सेस केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाने वसूल केला होता.
यावर्षी एक कोटीपेक्षा जास्त क्विंटल साखरेचे उत्पादन होण्याची शक्यता असून, त्यापासून सुमारे ९६ कोटी सेस वसूल होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यात २९, तर सातारा जिल्ह्यात १३ साखर कारखाने असून तीन जिल्ह्यांतील ५२ कारखान्यांत उत्पादित होऊन गोदामात साठा असलेल्या लाखो टन साखरेवर वाढीव दराने सेस आकारणी होणार असल्याने, केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाच्या महसुलात शेकडो कोटींची वाढ होणार आहे. हा वाढीव सेस अन्न प्रक्रिया मंत्रालयाकडे जाणार आहे. वाढीव सेसपासून मिळणाऱ्या महसुलातून अडचणीत असलेल्या साखर कारखान्यांना पुनर्वसन व नूतनीकरणासाठी कमी व्याज दरात कर्जपुरवठा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
नियमाप्रमाणे साखरेवरील सेस व अबकारी कर व्यापाऱ्यांनी भरावयाचे आहेत. मात्र साखरेला मागणी नसल्याने व्यापारी सेस व अबकारी कर देण्याची चिन्हे नसल्याने, सध्या तरी वाढीव सेसचा फटका ग्राहकांऐवजी साखर कारखान्यांनाच बसणार आहे. त्यामुळे साखर कारखानदारात नाराजीचा सूर उमटू लागला आहे. (वार्ताहर)
आर्थिक संकट : साखर जप्त होणार
जिल्ह्यातील १६ पैकी सांगली साखर कारखान्याची आर्थिक परिस्थिती कठीण असल्याने, अबकारी कर वसुलीसाठी या कारखान्याची साखर जप्त करण्यात आली होती. आता वाढीव सेस द्यावा लागणार असल्याने कारखान्यांच्या आर्थिक संकटात वाढ होणार आहे. यावर्षी एक कोटीपेक्षा जादा क्विंटल साखरेचे उत्पादन होण्याची शक्यता असून, ९६ कोटींचा सेस वसूल होणार आहे.