दुष्काळाची दाहकता: सांगलीतील जत तालुक्यात साडेतीन लाख पशुधन संकटात
By हणमंत पाटील | Published: May 24, 2024 01:10 PM2024-05-24T13:10:15+5:302024-05-24T13:10:46+5:30
चारा व पाणीटंचाईचे दुहेरी टंचाई : जनावरांची कवडीमोल दराने विक्री
दरीबडची : अपुऱ्या पावसामुळे वाया गेलेला खरीप व रब्बी हंगाम, पाणी व चाराटंचाईच्या दुहेरी संकटाने तीव्र दुष्काळी परिस्थिती ओढावली. यामुळे जत तालुक्यात वैरणीची टंचाई निर्माण झाली आहे. तीन लाख ४९ हजार ८९५ जनावरे संकटात सापडली आहेत. आचारसंहितेमुळे चारा छावण्या सुरू नाहीत. त्यामुळे जनावरे सांभाळणे परवडत नसल्याने त्यांना बाजार दाखविण्याशिवाय पर्याय नाही. तर दुष्काळी परिस्थितीमुळे जनावरांचे बाजार कमी होऊन कवडीमोल दराने विक्री करावी लागत आहे. त्यामुळे जत तालुक्यातील शेतकरी व पशुधन संकटात सापडले आहे.
दुष्काळी जत तालुक्यात शेती परवडत नसल्याने जोड व्यवसाय म्हणून पशुपालन केले जाते. खिलार जनावरांसाठी व माडग्याळ जातीच्या मेंढीसाठी तालुका प्रसिद्ध आहे. देखणी खिलार गाय आणि देखणा खोंड हे दुष्काळी माणदेशाचे वैभव आहे. जातिवंत देखणी, चपळ, चिवट आणि रोगप्रतिकारक असणारी खिलार जनावरे प्रसिद्ध आहेत. तालुक्यात गाई-बैल ७० हजार ९१६, म्हैशी ७० हजार ५८, शेळ्या ४५ हजार ९६४, मेंढ्या १ लाख ६२ हजार ८७७, असे एकूण ३ लाख ४९ हजार ८९५ पशुधन आहे. ४२ अंश सेल्सिअस एवढे उच्चांकी तापमान आहे. दुभत्या म्हशी-गाई जनावरांना जीवघेणा ठरू लागला आहे. खरीप व रब्बी हंगाम पावसाअभावी वाया गेला आहे. त्यामुळे चारा संपला आहे. चाऱ्याअभावी शेतकऱ्यांना जनावरे जगविणे कठीण झाले आहे.
१९७२ पेक्षा गंभीर परिस्थिती..
यावर्षी १९७२ पेक्षा गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. चारा व पिण्याचे पाणी कोठून द्यायचे, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे. दुभती जनावरे संकटात सापडली आहेत. वैरण विकतच आणून घालावी लागत आहे. वैरणी दरात वाढ झाली आहे. तालुक्यात २०१३ मध्ये २८ चारा छावणी सुरू होत्या. छावणीत ४० हजार २०० जनावरे होती. सध्या चाराटंचाईने जनावरे अशक्त झाली आहेत. शासनाने चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
कवडीमोलाने जनावरांची विक्री..
चाऱ्याअभावी भूकबळी होऊ नये. म्हणून शेतकरी जत, माडग्याळ, सांगोला, विजापूर येथील बाजारात जनावरांची विक्री करू लागले आहेत. बाजारात जनावरांना कवडीमोल किंमत मिळत आहे. त्यामुळे शेतकरी दोन्ही बाजूने संकटात सापडला आहे.
जनावरे संकटात सापडली आहेत. शेतकऱ्यांना जनावरे जगविणे अवघड झाले आहे. खुरट्या गवताअभावी शेळ्या-मेंढ्या या लहान जनावरांना चारा नाही. याकडे लक्ष देऊन चारा डेपो व चारा छावण्या सुरू कराव्यात. -रघू नागणे, शेतकरी, दरीकोणूर