Sangli: द्राक्ष, बेदाणा महोत्सवामुळे शेतकऱ्यांना मिळाली हक्काची बाजारपेठ - विवेक कुंभार
By अशोक डोंबाळे | Published: March 7, 2024 06:52 PM2024-03-07T18:52:22+5:302024-03-07T18:52:38+5:30
सांगली : द्राक्ष व बेदाणा महोत्सवामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध होण्यास मदत होईल. येत्या काळात जिल्ह्यात सर्वात ...
सांगली : द्राक्ष व बेदाणा महोत्सवामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध होण्यास मदत होईल. येत्या काळात जिल्ह्यात सर्वात मोठा द्राक्ष महोत्सव साजरा करूया, अशी ग्वाही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार यांनी दिली.
सांगली येथील कच्छी जैन भवनमध्ये कृषी विभाग, द्राक्ष संघ, कृषी निविष्ठा उत्पादक कंपन्या, बेदाणा व्यापारी असोसिएशन व बाजार समितीतर्फे महाशिवरात्री द्राक्ष दिनानिमित्ताने द्राक्ष व बेदाणा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन झाले. यावेळी कृषी उपसंचालिका प्रियंका भोसले, जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी धनाजी पाटील, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी स्वप्निल माने, द्राक्ष बागायतदार संघाचे विभागीय अध्यक्ष संजय बरगाले, विज्ञान समितीचे अध्यक्ष चंद्रकांत लांडगे, यांच्यासह बेदाणा व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
विवेक कुंभार म्हणाले, शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादनात वाढ केली आहे. ग्राहकांना द्राक्षाचे महत्त्व सांगणे अपरिहार्य आहे. त्यासाठी द्राक्ष संघ द्राक्ष उत्पादक शेतकरी यांनी पुढाकार घेतला पाहिजे.
संजय बरगाले म्हणाले, या महोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळाला असून दरवर्षी महाशिवरात्री द्राक्ष दिन दिनानिमित्त हा महोत्सव आयोजित केला जाणार आहे.
ब्लॅक क्वीन बेरीचे आकर्षण
द्राक्ष व बेदाणा महोत्सवात ब्लॅक क्वीन बेरी, फ्लेम सिडलेस, आरके, ज्योती सिडलेस, थॉमसन, आरा ३५, एसएसएन, सुपर सोनाका, विविध वाणांची द्राक्ष विक्रीसाठी शेतकऱ्यांनी आणली होती.