राजकीय अनास्था सांगली जिल्ह्यातील ४५ गावांतील शेतकऱ्यांच्या मुळावर, पाण्याअभावी पिके वाळली
By अशोक डोंबाळे | Published: March 16, 2024 07:19 PM2024-03-16T19:19:08+5:302024-03-16T19:19:31+5:30
कागदी घोडे नाचविण्यात प्रशासन व्यस्त
सांगली : राजकीय अनास्थेमुळे पलूस, वाळवा, तासगाव तालुक्यातील ४५ गावांमधील १३ हजार ३६६ हेक्टर क्षेत्रातील पिके वाळू लागली आहेत. शेतकरीपाणी प्रश्नावर टाहो फोडत असताना प्रशासन कागदी घोडे नाचविण्यात समाधानी मानत आहे. याबद्दल शेतकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
जिल्ह्यात सर्वच तालुक्यांत अत्यंत कमी पाऊस झाला आहे. नद्यांच्या पाणी पातळीत घट झाली आहे. जिल्ह्यात दुष्काळाची भयावह अवस्था पाहायला मिळत आहे. सांगली जिल्हा राज्य शासनाने दुष्काळी म्हणून जाहीर केला आहे. पण, प्रत्यक्षात कुठेही दुष्काळाच्या उपाययोजना तातडीने राबविल्या जात नाहीत. राजकर्ते आणि प्रशासन निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्यामुळे शेतकरी दुष्काळाचे चटके सहन करत आहेत. पलूस, तासगाव, वाळवा तालुक्यात दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. काही गावांना शेतीसह पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईचा सामना करावा लागत आहे.
कृष्णा व आरफळ कालव्यातून पाणी सोडण्याची राजकर्ते आणि प्रशासनाकडून केवळ घोषणाच होत आहे. पाणी सोडले जात नसल्याने शेतकऱ्यांवर संघर्ष करण्याची वेळ आली आहे. पलूस तालुक्यात तुपारीपासून वसगडेपर्यंतच्या शेतीला वरदान ठरलेल्या कृष्णा कालव्यातही पाणी सोडण्यासाठी सातारा जिल्ह्यातील काही लोकप्रतिनिधी टाळाटाळ करत असल्यामुळे त्यांच्यासमोर जलसंपदाचे अधिकारीही हतबल झाले आहेत.
द्राक्ष, केळीच्या बागा धोक्यात
पलूस तालुक्यातील द्राक्षबागा, ऊस, केळी आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. शेतकऱ्यांनी मंत्री, लोकप्रतिनिधी, पाटबंधारे अधिकारी, जिल्हाधिकारी, तहसीलदारांना निवेदने दिली, चर्चा केली, आंदोलने केली, तरीही कालव्यात पाणी सोडले जात नाही, हे दुर्दैव. तीच स्थिती आरफळ योजनेच्या बाबतीत आहे. मात्र, आरफळ योजनेतून काही महिन्यांत पाणी आले नसल्याने सांडगेवाडी, आंधळी, मोराळे, बांबवडे, पलूस, कुंडल येथे टंचाई निर्माण झाली आहे. विहिरी, तलाव, कूपनलिकांचे पाणी कमी झाले आहे. काही ठिकाणी विहीर, तलाव कोरडे पडले आहेत.
लोकसभेच्या निवडणुकीत पाणीप्रश्न पेटणार
केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी लोकसभेच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. पण, बरोबर याचवेळी सांगली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात पाण्याची तीव्र टंचाई आहे. पलूस, तासगाव, वाळवा तालुक्यातील ४५ गावांमधील शेतकऱ्यांनी महिनाभरापासून कृष्णा, आरफळ कालव्यात पाणी सोडण्याची मागणी केली आहे. पण, राजकर्ते आणि प्रशासन ४५ गावांचा पाणीप्रश्न सोडविण्यात अपयशी ठरले आहेत. यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीत कृष्णा कालव्याचा पाणीप्रश्न पेटणार आहे.