पितृपक्षामुळे फुलांचा बाजार कोमेजला, मागणीअभावी दरात घट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 12:21 PM2022-09-19T12:21:37+5:302022-09-19T12:22:15+5:30
मागणीअभावी गुलाब झेंडूसह सर्वच फुलांचे दर घटल्याने उत्पादक शेतकरी दसऱ्याच्या प्रतीक्षेत आहेत.
मिरज : गणेशोत्सवानंतर पितृपक्ष पंधरवड्यात मागणी नसल्याने मिरजेतील फुलांचा बाजार कोमेजला आहे. मागणीअभावी गुलाब झेंडूसह सर्वच फुलांचे दर घटल्याने उत्पादक शेतकरी दसऱ्याच्या प्रतीक्षेत आहेत.
गणेशोत्सवात आवक कमी असल्याने मिरजेतील फुलांच्या बाजारात फुलांचे दर वाढले होते. मात्र त्यानंतर पितृपक्ष पंधरवड्यात मंगल कार्ये व इतर कार्यक्रम नसल्याने फुलांना मागणी कमी आहे. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात हरितगृहातील डच गुलाब, जरबेरा कार्नेशिया या फुलांसह स्थानिक इतर फुलांची मिरजेच्या बाजारात विक्री होते. मिरजेतून मोठ्या शहरात फुलांची निर्यातही होते. फुलांना पावसाचा फटका बसल्याने आवक घटल्याने मिरजेतील फुलांच्या बाजारात उलाढाल थंडावली आहे.
झेंडू ३० ते ४० रुपये व निशिगंध शंभर रुपये प्रतिकिलो आहे. पावसाचा गलाटा फुलांच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला असून गणेशोत्सवात या फुलांचा दर शंभरावर पोहोचला होता. आता ही फुले ५० रुपयांवर आहेत. पावसाने झेंडूचेही नुकसान झाले असल्याने दसऱ्याला झेंडूचा दर शंभरावर जाण्याची शक्यता असल्याचे बाजारातील फूलविक्रेते आनंद माळी यांनी सांगितले. दरवाढीसाठी फूल उत्पादक शेतकऱ्यांना दसऱ्याची प्रतीक्षा आहे.
फुलांचे प्रतिकिलो दर
निशिगंध - १०० रुपये
शेवंती - ५० रुपये
गुलाब - १०० रुपये शेकडा
जरबेरा - १०० रुपये पेंडी
गलांडा - ६० रुपये
झेंडू - ३० रुपये