पावसाचा जोर ओसरला; अलमट्टीतून विसर्ग कमी केला, केवळ 'इतक्या' क्युसेकने विसर्ग सुरु
By अशोक डोंबाळे | Published: July 29, 2023 07:22 PM2023-07-29T19:22:16+5:302023-07-29T19:22:41+5:30
पश्चिम महाराष्ट्रातील धरणातील पाणीसाठी जाणून घ्या
सांगली : धरण क्षेत्रासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी झाल्यामुळे अलमट्टी धरणातून सोडण्यात आलेला विसर्ग शनिवारी कमी करून केवळ ७५ हजार क्युसेकने सुरू आहे. धरणात सध्या एक लाख ४० हजार ९४८ क्युसेकने पाण्याची आवक होत असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले.
अलमट्टी धरणाची पाणी क्षमता १२३ टीएमसी असून, आता धरणात ९०.३३ टीएमसी पाणीसाठा आहे. ७३ टक्के धरण भरले आहे. धरणात सध्या एक लाख ४० हजार ९४८ क्युसेकने पाण्याची आवक होत आहे. धरणात पाण्याची आवक जास्त असली तरी पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी असल्यामुळे अलमट्टी धरण व्यवस्थापनाने विसर्ग कमी केला आहे. शुक्रवारी धरणातून एक लाख २५ हजार क्युसेकचा विसर्ग होता. ५० हजार क्युसेकने विसर्ग कमी करून शनिवारी दुपारपासून ७५ हजार क्युसेकने विसर्ग चालू आहे. पाऊस आणि धरणातील पाणीसाठ्यावर कर्नाटक आणि महाराष्ट्राचे जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी लक्ष ठेवून आहेत.
पश्चिम महाराष्ट्रातील धरणातील पाऊस
धरण - आजचा साठा - धरणाची क्षमता
कोयना - ६९.३३ - १०५.२५
धोम - ९.८० - १३.५०
कन्हेर - ६.२९ - १०.१०
वारणा - २९.२५ - ३४.४०
दूधगंगा - १६.५४ - २५.४०
राधानगरी - ८.२७ - ८.३६
तुळशी - २.११ - ३.४७
कासारी - २.२८ - २.७७
पाटगाव - २.९५ - ३.७२
धोम - ३.५३ - ४.०८
उरमोडी - ५.५७ - ९.९७
तारळी - ५.०३ - ५.८५
अलमट्टी - ९०.३३ - १२३
जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला
सांगली जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत सरासरी ३.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत पडलेला पाऊस व कंसात १ जूनपासून आतापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे. मिरज २.३ (१९४.३), जत ३.४ (१४८), खानापूर ०.९ (११५.८), वाळवा २.४ (२१०.४), तासगाव ४ (१९७), शिराळा ७.८ (५२९.५), आटपाडी ०.९ (११३.२), कवठेमहांकाळ ६.२ (१६५.६), पलूस १.९ (१७८.९), कडेगाव ५.७ (१४३.२).