पुराच्या धोक्याने सांगली कारागृहातील ८० कैद्यांचे कळंबा कारागृहात स्थलांतर
By घनशाम नवाथे | Published: July 26, 2024 03:21 PM2024-07-26T15:21:49+5:302024-07-26T15:22:28+5:30
२०१९ मध्ये कारागृहात महापुराचे पाणी आल्यानंतर दोन कैदी पळाल्याचा प्रकार घडला होता
सांगली : धरण पाणलोट क्षेत्रातील पाऊस आणि धरणातील विसर्ग यामुळे सांगलीतील पाण्याची पातळी वाढली आहे. काही भागांत पुराचे पाणी शिरले आहे. या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा कारागृहातील कैद्यांचे स्थलांतर सुरू आहे. गुरुवारी सायंकाळी ८० कैद्यांचे कळंबा कारागृहात स्थलांतर केले. त्यानंतर शुक्रवारीदेखील कैद्यांचे स्थलांतर करण्याची प्रक्रिया सुरू होती.
जिल्ह्यात २००५, २०१९ आणि २०२१ च्या महापुराच्या काळात कारागृहातील कैद्यांचे स्थलांतर करण्यात आले होते. यंदाही पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे कारागृह प्रशासनाने सुरक्षिततेसाठी कैद्यांचे स्थलांतर करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडून परवानगी घेतली आहे. गुरुवारी ८० कैद्यांचे कळंबा कारागृहात स्थलांतर करण्यात आले आहे. त्यानंतर शुक्रवारीदेखील आणखी काही कैद्यांचे स्थलांतर करण्याबाबत हालचाली सुरू होत्या.
२०१९ मध्ये कारागृहात महापुराचे पाणी आल्यानंतर दोन कैदी पळाल्याचा प्रकार घडला होता. कैद्यांच्या सुरक्षिततेसाठी कारागृह प्रशासनाने यंदा लवकरच हालचाली करत पहिल्या टप्प्यात ८० कैदी कळंबा कारागृहात स्थलांतरित केले. उर्वरित कैदी स्थलांतराची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले. स्थलांतर करण्यात येत असलेल्या कैद्यांमध्ये गंभीर गुन्ह्यातील कैद्यांचा समावेश आहे. पुराचे पाणी जास्तच वाढल्यास सर्वच कैद्यांना स्थलांतरित करावे लागेल, असेही सांगितले.