अवकाळीच्या फटका; द्राक्षबागायतदाराची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2021 11:36 AM2021-12-15T11:36:12+5:302021-12-15T11:37:02+5:30
अवकाळी पावसाने बागेचे मोठे नुकसान झाल्याने कर्जफेडीच्या विवंचनेत हाेते. कर्ज देणाऱ्या काही खासगी सावकारांनीही कर्जवसुलीचा तगादा लावल्याची चर्चा.
मिरज : द्राक्षबागेला अवकाळी पावसाचा फटका बसल्याने कर्जफेडीच्या विवंचनेतून मालगाव (ता. मिरज) येथील जयहिंद सोसायटीचे माजी अध्यक्ष चिदानंद सातलिंग घुळी (वय ५५) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी दुपारी ही घटना घडली.
मालगावातील शेतकरी चिदानंद घुळी यांच्या सात एकर शेतजमिनीपैकी अडीच एकरात द्राक्षबाग आहे. अवकाळी पाऊस व निसर्गाच्या अवकृपेचा द्राक्षबागेला फटका बसल्याने घुळी हवालदिल झाले होते. गतवर्षी त्यांनी द्राक्षबागेसाठी काढलेल्या सुमारे साठ लाख रुपयांच्या कर्जाची दोन एकर शेती विकून परतफेड केली हाेती. या वर्षीही त्यांनी द्राक्षबागेच्या उत्पन्नाच्या आशेवर सोसायटी व बँकेचे शेतीसाठी कर्ज काढले होते. मात्र या महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने बागेचे मोठे नुकसान झाल्याने कर्जफेडीच्या विवंचनेत हाेते.
मंगळवारी दुपारी तीन वाजता घर व द्राक्षबागेच्या मध्यभागी असलेल्या आंब्याच्या झाडाला त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.
खासगी सावकारांचाही तगादा
घुळी यांना कर्ज देणाऱ्या काही खासगी सावकारांनीही कर्जवसुलीचा तगादा लावल्याची चर्चा होती. ते जयहिंद विकास सोसायटीचे माजी अध्यक्ष व गेली सात वर्षे संचालक होते. त्यांच्या आत्महत्येने गावात हळहळ व्यक्त होत होती.