वाळवा, मिरज, कडेगाव तालुक्यांमुळे संपूर्ण सांगली जिल्हा वेठीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2021 12:23 PM2021-06-14T12:23:52+5:302021-06-14T12:24:50+5:30
CoronaVIrus Sangli : वाळवा, मिरज आणि कडेगाव तालुक्यांच्या कोरोनाविषयक बेफिकीरीमुळे जिल्ह्याचा कोरोना पॉझिटीव्हिटी रेट १० टक्क्यांच्या खाली येण्यास तयार नाही. तीन तालुक्यांमुळे संपूर्ण जिल्हा वेठीस धरला गेला आहे. तेथील दररोज वाढत्या रुग्णसंख्येने जिल्ह्याला घोर लावला आहे.
संतोष भिसे
सांगली : वाळवा, मिरज आणि कडेगाव तालुक्यांच्या कोरोनाविषयक बेफिकीरीमुळे जिल्ह्याचा कोरोना पॉझिटीव्हिटी रेट १० टक्क्यांच्या खाली येण्यास तयार नाही. तीन तालुक्यांमुळे संपूर्ण जिल्हा वेठीस धरला गेला आहे. तेथील दररोज वाढत्या रुग्णसंख्येने जिल्ह्याला घोर लावला आहे.
पॉझिटीव्हिटी रेट १० टक्क्यांपेक्षा कमी येताच व्यवहार खुले करण्याची ग्वाही पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे, पण खुद्द पालकमंत्र्यांचाच मतदारसंघ नियंत्रणाबाहेर गेला आहे. वाळवा तालुक्याचा पॉझिटीव्हीटी दर १३ टक्के आहे. तो कमी करण्यासाठी निर्बंध कडक करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. तरीही वाळव्याला कोरोना नियंत्रणात यश आलेले नाही.
तालुक्यात सध्या १ हजार ७४९ सक्रिय रुग्ण आहेत. कोरोनाचे तब्बल ३२ हॉटस्पॉट आहेत. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याची गरज आहे, पण तसे होताना दिसत नाही. मिरज व कडेगाव तालुक्यांतही दररोजची वाढीव रुग्णसंख्या जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट वाढवत आहे. सर्वाधिक मृत्यूदेखील वाळवा (४१८) आणि मिरज (४२९) तालुक्यांतच झाले आहेत. यंत्रणा व लोकांची बेफिकिरी लॉकडाऊन वाढवणारी ठरत आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनीही दोन दिवसांपूर्वी वाळव्यात कोरोनाचे हॉटस्पॉट असणाऱ्या गावांना भेटी देऊन कडक कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार प्रामाणिक अंमलबजावणी झाल्यास कोरोना नियंत्रणात येण्यास वेळ लागणार नाही.
सांगली, मिरजेला जमते, वाळव्याला का नाही?
सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्राची लोकसंख्या साडेसहा लाखांवर असताना येथील दररोजची रुग्णसंख्या सरासरी १२० आहे. शहरी भाग असूनही स्थिती अत्यंत नियंत्रणात आहे. मग वाळव्यासारख्या ग्रामिण भागाला नियंत्रण का शक्य होत नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मिरज व कडेगाव तालुक्यांच्या दररोजच्या रुग्णसंख्येनेही जिल्ह्याला घोर लावला आहे.
तुलनात्मक कोरोनाचा फैलाव असा
- महापालिका क्षेत्र लोकसंख्या ७ लाख - दैनंदिन सरासरी रुग्ण १२० (०.०१ टक्के)
- वाळवा तालुका लोकसंख्या ४ लाख ५६ हजार, दैनंदिन सरासरी रुग्ण २२५ (०.०५ टक्के)
- मिरज तालुका लोकसंख्या ३ लाख ५१ हजार, दैनंदिन सरासरी रुग्ण ११० (०.०३ टक्के)
- कडेगाव तालुका लोकसंख्या १ लाख ४३ हजार, दैनंदिन सरासरी रुग्णसंख्या ९५ ( ०.०६ टक्के)
महापालिका क्षेत्र स्वतंत्र गृहीत धरुन संपूर्ण व्यवहार त्वरीत खुले केले पाहिजेत. अन्य तालुक्यांतील वाढती रुग्णसंख्या सांगली-मिरजेला रेड झोनमध्ये नेणारी ठरत आहे. महापालिका क्षेत्रातील दररोजची रुग्णसंख्या अत्यल्प असतानाही निर्बंध कायम ठेवणे योग्य नाही.
- समीर शहा,
व्यापारी एकता असोसिेशन