पाणी संस्थांमुळेच वाळवा समृद्ध
By admin | Published: January 21, 2015 10:03 PM2015-01-21T22:03:19+5:302015-01-21T23:51:59+5:30
जयंत पाटील : करंजवडेत पाणी संस्थेतर्फे भेट वस्तूंचे वाटप
ऐतवडे बुद्रुक : पाणी व सहकारी पाणी पुरवठा संस्थांमुळेच वाळवा तालुका सुजलाम् सुफलाम् झाला. त्यामुळेच तालुक्यातून अनेकांनी सर्वच क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली. पाणी हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे, असे प्रतिपादन माजी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी केले.करंजवडे (ता. वाळवा) येथील राजारामबापू पाटील सह. साखर कारखाना पुरस्कृत राजारामबापू सह. पाणी पुरवठा संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त सभासदांना भेटवस्तू वितरण समारंभात ते बोलत होते.जयंत पाटील म्हणाले, पाणी आल्यामुळेच शेतीची व समाजाची प्रगती झाली. त्यामुळे तालुका सुधारला. तसेच विधानसभा निवडणुकीत मानसिंगराव नाईक यांचा पराभव म्हणजे अचानकपणे आलेले वादळ असाच आहे. मानसिंगराव नाईक हे स्थिर राजकारणी असून, त्यांचे राजकारण व समाजकारणातील अस्तित्व नक्कीच बळकट आहे.यावेळी मानसिंगराव नाईक, राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. जयंत पाटील यांच्याहस्ते सभासदांना भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी शिवाजीरावसाळुंखे, मीना मलगुंडे, बी. के. पाटील, संजय पाटील, शहाजी गायकवाड, राजेंद्र दिंडे, शशिकांत पाटील, दिलीप खांबे, संग्राम गायकवाड, बळवंत पाटील, जयवंत पाटील, बसवेश्वर करडे, धनंजय पाटील, चाँदसाहेब तांबोळी उपस्थित होते. (वार्ताहर)
या गावांनी दिवा लावला..!--या कार्यक्रमात मानसिंगराव नाईक यांच्या पराभवाचे विश्लेषण करताना जयंत पाटील म्हणाले, कासेगाव, तांबवे व वाटेगाव या गावांनीच मतदानात दिवा लावल्यामुळे मानसिंगराव नाईक यांचा पराभव झाला.