थकबाकीदार व्यापाऱ्यांना सांगलीत बेदाणा सौद्यात बंद, बाजार समितीचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2023 06:06 PM2023-11-28T18:06:12+5:302023-11-28T18:06:26+5:30
बेदाणा असोसिएशनकडूनही १०० टक्के वसुलीवर ठाम
सांगली : बेदाणा व्यापाऱ्यांकडून अजूनही शून्य पेमेंट पूर्ण झालेले नाही. त्यामुळे सांगली-तासगाव बेदाणा व्यापारी असोसिएशनने शून्य पेमेंट पूर्ण करण्यासाठी व्यापाऱ्यांना सौद्यात बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. सांगली बाजार समिती सचिव महेश चव्हाण यांनीही शून्य पेमेंटचे पत्र देणाऱ्यांनाच सौद्यात सहभागी होण्याची संधी देण्यात येणार आहे. दरम्यान, शंभर टक्के शून्य पेमेंट केलेल्या व्यापाऱ्यांना बेदाणा सौद्यात सहभाग देऊन दि. २९ नोव्हेंबरपासून सौदे सुरू होणार आहेत.
सांगली, तासगाव आणि पंढरपूर येथील बेदाणा सौद्यामध्ये दरवर्षी हजारो कोटींची उलाढाल होत आहे. या ठिकाणी होणाऱ्या सौद्यात देशभरातील व्यापारी सहभागी होत आहेत. यामुळे या व्यापाऱ्यांकडील अडते, शेतकऱ्यांचे सर्व पैसे येण्यासाठी दि. ३० ऑक्टोबर ते दि. २५ नोव्हेंबर या कालावधीत बेदाणा सौदे बंद ठेवले होते. शनिवारी महिना संपत असतानाही अजून शंभर टक्के शून्य पेमेंट झाले नसल्यामुळे सांगली बेदाणा सौदे बंद ठेवले होते.
सांगली, तासगाव बेदाणा असोसिएशनने सर्व व्यापाऱ्यांना मंगळवारपर्यंत १०० टक्के पैसे आडत व शेतकऱ्यांचे दिले आहेत, असे पत्र देण्यासाठी मुदत दिली आहे. या मुदतीमध्ये पैसे न दिल्यास बुधवारी (दि. २९) होणाऱ्या बेदाणा सौद्यात व्यापाऱ्यांना सहभागी होऊ देणार नाही, असे सर्व व्यापाऱ्यांना असोसिएशनने कळविले आहे. बाजार समितीचे सचिव चव्हाण यांनीही ज्या व्यापाऱ्यांनी पैसे थकीत ठेवले आहे, त्यांना बेदाणा सौद्यात सहभागी होता येणार नाही, असा इशारा दिला आहे.
बहुतांशी बेदाणा व्यापाऱ्यांनी आडते, शेतकऱ्यांचे थकीत सर्व पैसे दिले आहेत. केवळ दोन ते तीन व्यापाऱ्यांकडे पैसे थकीत असून, त्यांना देण्याची सूचना दिली आहे. जोपर्यंत ते थकीत पैसे देणार नाहीत, तोपर्यंत त्यांना सौद्यात सहभागी होता येणार नाही. - राजेंद्र कुंभार, अध्यक्ष, सांगली-तासगाव बेदाणा असोसिएशन.
सर्व बेदाणा व्यापाऱ्यांना आडते, शेतकऱ्यांचे देणे-घेणे नसल्याचे पत्र देण्याची सूचना दिली आहे. ज्या व्यापाऱ्यांकडून देणे-घेणे नसल्याचे पत्र मिळेल, त्यांनाच बेदाणा सौद्यात सहभागी होता येणार नाही. थकबाकीदारांना सौद्यात सहभागी होता येणार नाही. -महेश चव्हाण, सचिव, सांगली बाजार समिती