सिंचन योजनांच्या पाणीपट्टी वसुलीवर टग्यांचाच डल्ला
By admin | Published: May 11, 2017 11:25 PM2017-05-11T23:25:14+5:302017-05-11T23:25:14+5:30
सिंचन योजनांच्या पाणीपट्टी वसुलीवर टग्यांचाच डल्ला
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : ताकारी, टेंभू आणि म्हैसाळ उपसा सिंचन योजना काही प्रमाणात चालू झाल्या असून त्यांचे पाणी वाटप आणि पाणीपट्टी वसुलीची यंत्रणा उभी करण्याकडे शासन दुर्लक्ष करीत आहे. गावटग्यांनी पैसे गोळा केल्यानंतर ते नेण्यासाठी अधिकारी जाईपर्यंत त्यावर काही गावटगे डल्ला मारत आहेत.
टेंभू, ताकारी, म्हैसाळ उपसा सिंचन योजना कार्यान्वित करून जिल्ह्यातील कडेगाव, खानापूर, तासगाव, आटपाडी, जत, कवठेमहांकाळ, मिरज तालुक्यातील दीड लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे शासनाचे उद्दिष्ट होते. त्यापैकी सध्या तिन्ही योजना कार्यान्वित झाल्यामुळे सुमारे २२ हजार हेक्टर क्षेत्रच सिंचनाखाली आहे. उर्वरित क्षेत्राला अद्यापही पाणी मिळालेले नाही. केवळ जलसंपदा विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळेच शेतकऱ्यांना पाण्याचा लाभ मिळत नाही. शासनाने ताकारी, टेंभू, म्हैसाळ योजनांवर चार हजार कोटी रूपये खर्च केले आहेत. पण, या योजनांचे पाणी वाटपासाठी लागणारी यंत्रणा कार्यान्वित करण्याकडे दुर्लक्ष आहे. यामुळेच दुष्काळातही ओढ्या-नाल्यांतून पाणी सोडल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे.
म्हैसाळ योजनेचे पाणी कर्नाटकला मंगसुळीपर्यंत जाते. जत, आटपाडी, तासगाव, कडेगाव, कवठेमहांकाळ, मिरज, खानापूर तालुक्यातील शेतकरी वर्षानुवर्षे दुष्काळात होरपळत आहेत. येथील शेतकरी द्राक्ष, डाळिंब बागा जगविण्यासाठी हजारो रूपये टँकरवर खर्च करतात. त्यांना पाच ते सात हजाराची पाणीपट्टी निश्चितच जास्त नाही. ते पैसेही भरण्यासाठी तयार आहेत. पण, ते पैसे व्यवस्थित वसूल करण्यासाठी पाटबंधारे विभागाकडे कुठलीही सक्षम यंत्रणाच कार्यरत नाही. पाणीपट्टी वसुलीसाठी गावटग्यांवरच भिस्त आहे. नियोजनशून्य कारभार : संपतराव पवार
यात्रेची वर्गणी गोळा केल्याप्रमाणे सिंचन योजनांची पाणीपट्टी वसूल केली जाते. पाणीही वाट्टेल त्यापध्दतीने सोडून दिले जात असून, यामध्ये जलसंपदा विभागाचे कोणतेही नियोजन नाही. योजना चालू होऊन दहा ते बारा वर्षे झाली आहेत. तरीही पोटकालव्याचा पत्ताच नाही. शेतकऱ्यांना योग्य पध्दतीने पाणी दिले पाहिजे. योग्य पध्दतीनेच म्हणजे पाटबंधारे अथवा जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी रितसर पावती देऊनच शेतकऱ्यांकडून पाणीपट्टी वसूल केली पाहिजे. पाणीपट्टी वसुली शासकीय यंत्रणेमार्फतच व्हावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आणि पाणी चळवळीचे नेते संपतराव पवार यांनी केली.
पैसे भरल्याची पावतीच मिळत नाही : धायगुडे
टेंभू योजनेच्या लाभक्षेत्रात आमचे गाव येत आहे. वर्षातून दोनवेळा लोकच पैसे गोळा करून अधिकाऱ्यांकडे देतात. पैसे भरल्यानंतर पावतीही मिळत नाही. यामुळे आर्थिक गैरव्यवहार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कर्मचाऱ्यांमार्फत पावती देऊनच पैसे वसूल करावेत. शंभर टक्के शेतकरी पैसे भरण्यास तयार आहेत, अशी प्रतिक्रिया आटपाडी तालुक्यातील हिवतड येथील शेतकरी प्रमोद धायगुडे यांनी दिली.