दुप्पट शेती उत्पन्न म्हणजे सरकारचे दिवास्वप्न : पृथ्वीराज चव्हाण
By admin | Published: April 26, 2017 01:56 PM2017-04-26T13:56:40+5:302017-04-26T13:56:40+5:30
शेतीचे उत्पन्न पाच वर्षात दुप्पट करून दाखवण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या सरकारची घोषणा म्हणजे एक दिवास्वप्न आहे, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत.
Next
ऑनलाइन लोकमत
सांगली, दि. 26 - शेतीचे उत्पन्न पाच वर्षात दुप्पट करून दाखवण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या सरकारची घोषणा म्हणजे एक दिवास्वप्न आहे. सरकारमधील अर्थतज्ज्ञांनी या गोष्टी कशा शक्य आहेत, याचे स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी येथे संघर्ष यात्रेदरम्यान पत्रकारांशी बोलताना केली.
ते म्हणाले की, निती आयोगाने प्रत्येकाला घर, पुरेशी वीज, वातानुकुलीत यंत्र मिळण्याचेही स्वप्न दाखविले आहे. अनेक लोकांना दोनवेळच्या पोटाची चिंता असताना त्यांच्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर सुखसोयी कशा मिळणार, याचे स्पष्टीकरण अर्थतज्ज्ञांनी द्यावे.
पाच वर्षात शेतीमधील उत्पन्नात दुप्पट वाढीचेही आश्वासन नरेंद्र मोदींनी दिले आहे. वास्तविक आघाडी सरकारच्या कालावधीत असलेला शेती उत्पन्नाचा टक्का भाजप सरकारच्या कालावधीत घटलेला आहे. त्यामुळे उत्पन्न दुप्पट कसे होणार. दरवर्षी १५ ते १६ टक्के शेतीमालांसाठी दरवाढ द्यायला हवी. प्रतिकूल परिस्थितीतून शेतक-यांना बाहेर पडण्याचे मार्ग दिले पाहिजेत. तरच उत्पन्न वाढू शकते. सध्याची सरकारची धोरणे पाहिली, तर ती नेमकी उलटी आहेत. त्यामुळे उत्पन्नवाढीचे हे दिवास्वप्नच ठरणार आहे, असे ते म्हणाले.
आगामी काळातही शेतीला प्रतिकूल सरकारी धोरणाचा मोठा फटका बसण्याचीच चिन्हे दिसत आहेत. शेतकरी दिवसेंदिवस अधिक अडचणीत येत आहे. अशा परिस्थितीत त्यांना आधार देण्याऐवजी सरकार केवळ आश्वासने देण्यात धन्यता मानत आहे, असे ते म्हणाले.
नारायण राणे यांच्याबद्दल चव्हाण म्हणाले की, ते संघर्ष यात्रेत नसले तरी कॉंग्रेसमध्येच आहेत. नुकतीच त्यांनी राहुल गांधींचीही भेट घेतली होती. ते नाराज असल्याची चर्चा चुकीची आहे.