सांगलीत दुर्गामाता दौडीचा मुद्दा ठरणार कळीचा, वादाचा नेमका मुद्दा जाणून घ्या

By अविनाश कोळी | Published: September 21, 2022 06:59 PM2022-09-21T18:59:24+5:302022-09-21T19:11:27+5:30

कोरोनामुळे दोन वर्षे खंडित झालेली परंपरा पुन्हा सुरु होत असताना नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे

Durga Mata race will be the key issue In Sangli | सांगलीत दुर्गामाता दौडीचा मुद्दा ठरणार कळीचा, वादाचा नेमका मुद्दा जाणून घ्या

सांगलीत दुर्गामाता दौडीचा मुद्दा ठरणार कळीचा, वादाचा नेमका मुद्दा जाणून घ्या

Next

सांगली : नवरात्रोत्सवात गेल्या ३७ वर्षांपासून शिवप्रतिष्ठानमार्फत सांगलीत दुर्गामाता दौड काढण्यात येते. कोरोनामुळे दोन वर्षे खंडित झालेली परंपरा पुन्हा सुरु होत असताना नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. शिवप्रतिष्ठान व शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान या दोन्ही संघटनांच्या वेगवेगळ्या बैठका झाल्या आहेत. त्यामुळे दोन्ही संघटना दौडीत एकत्र येणार की वेगवेगळ्या दौडी होणार हा मुद्दा चर्चेत आला आहे.

शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानने सांगलीतील दौडीत सहभागी होण्याचा निर्धार केला आहे, मात्र संघटना वेगवेगळ्या असल्याने जुन्या दौडीत त्यांना समाविष्ट केले जाणार की त्यांना बाजुला केले जाणार, असा प्रश्न उपस्थित हाेत आहे. संभाजीराव भिडे यांनी शिवप्रतिष्ठानची स्थापना केली आहे. त्यांच्या संघटनेतून फुटून नितीन चौगुले यांनी शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानची स्थापना केली आहे. दोन्ही संघटनांकडे कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे.

नवी संघटना झाल्यापासून कोरोनामुळे दौडीच झाल्या नव्हत्या. त्यामुळे वादाचा प्रसंग निर्माण झाला नाही. आता विभाजनानंतर प्रथमच दौड होत असल्याने व दोन्ही संघटना दौडीबाबत आग्रही असल्याने वादाचा प्रसंग निर्माण होण्याची चर्चा सुरु झाली आहे.

अशी असते दौड...

शिवप्रतिष्ठानच्यावतीने १९८५ पासून सांगलीत दौड होत आहे. नऊ दिवस पहाटे ५ वाजता सांगलीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून दौड सुरु होते. शहरातील प्रमुख मार्गावरुन दौड माधवनगर रोडवरील दुर्गामाता मंदिराजवळ येते. याठिकाणी दर्शन घेऊन ध्येयमंत्र, प्रेरणामंत्र होऊन सांगता करण्यात येते.

वादाचा मुद्दा काय आहे?

शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या बुधवारी झालेल्या बैठकीत संस्थापक नितीन चौगुले यांनी सांगलीतील दौडीत सहभागी होण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे. स्वतंत्र दौडीचा मुद्दा त्यांनी मांडला नाही. दुसरीकडे शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते व संस्थापक संभाजीराव भिडे ‘युवा’च्या कार्यकर्त्यांना सहभागी करुन घेणार का, असा प्रश्न आहे. त्यांनी सहभागी करुन घेतले नाही, तर वेगळी दौडही निघण्याची शक्यता आहे.

Web Title: Durga Mata race will be the key issue In Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.