दुर्गेश, परशासह नऊजणांवर गुन्हा

By admin | Published: July 5, 2016 11:31 PM2016-07-05T23:31:12+5:302016-07-06T00:22:03+5:30

गुंडाचा खून : सांगली, कर्नाटकात छापे; एक ताब्यात; तणाव कायम

Durgesh, 9 people offenses including Parshahi | दुर्गेश, परशासह नऊजणांवर गुन्हा

दुर्गेश, परशासह नऊजणांवर गुन्हा

Next

सांगली : येथील गोकुळनगरमध्ये रवींद्र कांबळे या गुंडाचा खून केल्याप्रकरणी दुर्गेश पवार व त्याचा भाऊ प्रशांत ऊर्फ परशा पवारसह नऊजणांविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खुनानंतर सर्व संशयितांनी शहरातून पलायन केले आहे. त्यांच्या शोधासाठी पोलिसांची चार पथके विविध भागात रवाना करण्यात आली आहेत. पथकांनी मंगळवारी सांगली, तसेच कर्नाटकात छापे टाकले. यातील अशोक बाळाराम जोंधळे (रा. माकडवाले गल्ली, परिसर, सांगली) या संशयितास ताब्यात घेतले आहे.
परशा नागाप्पा पवार, दुर्गेश नागाप्पा पवार, नागेश ऊर्फ काळू दुर्गाप्पा पवार, विशाल पवार, राकेश पवार, आप्पा भीमाप्पा कांबळे, गणेश रामाप्पा ऐवळे, अशोक बाळाराम जोंधळे (सर्व रा. वडर कॉलनी, माकडवाले गल्ली, परिसर, सांगली) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. मंगळवारीही वडर कॉलनी, गोकुळनगर व प्रेमनगर वेश्या वस्तीत तणाव होता. त्यामुळे पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
गुंड रवींद्र कांबळे हा म्हमद्या नदाफ टोळीतील आहे. म्हमद्याने २००९ मध्ये दुर्गेश पवारवर प्रेमनगरमधील वेश्या वस्तीत भरदिवसा खुनीहल्ला केला होता. तेव्हापासून दुर्गेश पवारची टोळी म्हमद्यावर चिडून होती. तसेच परशा पवार याची गोकुळनगरमध्ये नेहमी उठबस असायची. रवींद्र कांबळेही तेथेच असायचा. या भागात वर्चस्व कुणाचे, यावरुन या दोघांत तीन महिन्यांपूर्वी वादावादी झाली होती. तेव्हापासून त्यांच्यात खुन्नस निर्माण झाली होती. सोमवारी गोकुळनगरमध्ये त्यांच्यातील खुन्नस उफाळून आली. तत्पूर्वी परशा पवार व त्याचे साथीदार हत्यार व मिरची पूड घेऊन तयार होते. त्यांनी रवींद्रला मारहाण करून खाली पाडले, त्यानंतर त्याचा दगडाने ठेचून खून केला.
संशयितांच्या हल्ल्यात रवींद्रचा मेहुणा मच्छिंद्र माने हाही गंभीर जखमी झाला होता. सोमवारी मध्यरात्री शवविच्छेदन तपासणी झाली. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. रवींद्रच्या रक्ताचे नमुने घेऊन ते डीएनए तपासणीला पाठविले आहेत. रक्ताने माखलेले कपडेही तपासणीला प्रयोगशाळेत पाठविले आहेत. रवींद्रचा भाऊ देवेंद्र याची फिर्याद घेऊन दुर्गेश पवारसह नऊजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुर्गेश व परशा पवार कर्नाटकात आश्रयाला असल्याची माहिती मिळताच पोलिसांची दोन पथके तिकडे रवाना केली आहेत. शहरातील हनुमाननगर, टिंबर एरिया, गोकुळनगर, संजयनगर, वडर कॉलनी येथेही पथकाने छापे टाकून संशयितांचा शोध घेतला. रात्री उशिरापर्यंत संशयितांना अटक करण्यात आलेली नव्हती. पोलिसांकडून त्यांचा कसून शोध सुरू आहे. (प्रतिनिधी)


हॉटेलमध्ये ‘गेम’चा बेत फसला
आपटा पोलिस चौकी परिसरात दोन हॉटेल समोरासमोर आहेत. सोमवारी दुपारी परशा पवारची टोळी एका हॉटेलात, तर रवींद्र व त्याचा मेहुणा दुसऱ्या हॉटेलमध्ये दारू पिण्यास बसले होते. त्यावेळी परशा मिरचीपूड व चाकू घेऊन तयारीत होता. हॉटेलमध्ये घुसूनच रवींद्रची ‘गेम’ करण्याचा त्यांचा विचार होता. पण तिथे त्याला मारताना टेबल व खुर्चांमुळे अडचण होईल, असा विचार करुन त्याने हा बेत रद्द केला. रवींद्र चार वाजता हॉटेलमधून बाहेर पडला. त्यावेळीही परशाने मिरचीपूड बाहेर काढून तिथेच त्याला संपविण्याचा विचार केला. पण त्याच्या साथीदारांनी विरोध केला. गोकुळनगरमध्येच त्याला संपवू, असा निर्णय त्यावेळी घेतला. त्यानुसार परशा व साथीदार रवींद्रच्या मागावर गेले अन् त्यांनी तेथे रवींद्रचा खात्मा केला.

नगरसेवकाच्या संपर्कात
अटकेच्या भीतीने संशयित पसार झाले असले तरी, त्यांनी पोलिसांना शरण येण्याची तयारी दर्शविली आहे. यासाठी ते एका नगरसेवकाच्या संपर्कात आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. यासंदर्भात या नगरसेवकाने पोलिसांना अजूनही संपर्क केलेला नाही. पोलिसांनी त्यांच्या घरांवरही छापे टाकले. पण दुर्गेश व परशाचा सुगावा लागलेला नाही.

Web Title: Durgesh, 9 people offenses including Parshahi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.