सांगलीत अतिक्रमणविरोधी कारवाईवेळी वादावादी, नगरसेवकानेच घेतली विरोधी भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 01:21 PM2017-11-02T13:21:42+5:302017-11-02T13:34:20+5:30

सांगली शहरातील मुख्य बाजारपेठेतील अतिक्रमण काढण्याच्या मोहिमेला बुधवारी मारुती चौकात पुन्हा ब्रेक लागला. झाशी चौकापासून ते मारुती चौकापर्यंत ही मोहीम सुरळीतपणे पार पडली. पण मारुती चौकात विरोधी पक्षातील नगरसेवक व एका नगरसेविका पतीने विरोधी भूमिका घेत ही मोहीमच हाणून पाडली.

During the anti-encroachment proceedings in Sangli, the controversy, the corporator has taken anti roles | सांगलीत अतिक्रमणविरोधी कारवाईवेळी वादावादी, नगरसेवकानेच घेतली विरोधी भूमिका

सांगलीत नगरसेवक बाळू गोंधळी, खंडागळे यांनी पथकाशी हुज्जत घालून अतिक्रमण मोहिमेला बुधवारी पुन्हा ब्रेक लागला.

Next
ठळक मुद्देसांगली महापालिकेच्या मोहिमेला पुन्हा ब्रेक मारुती चौकात पथक-नगरसेवकांत जुंपलीजप्त साहित्य परत करण्यास पाडले भाग

सांगली ,दि. ०२ : शहरातील मुख्य बाजारपेठेतील अतिक्रमण काढण्याच्या मोहिमेला बुधवारी मारुती चौकात पुन्हा ब्रेक लागला. झाशी चौकापासून ते मारुती चौकापर्यंत ही मोहीम सुरळीतपणे पार पडली. पण मारुती चौकात विरोधी पक्षातील नगरसेवक व एका नगरसेविका पतीने विरोधी भूमिका घेत ही मोहीमच हाणून पाडली. यावेळी या दोघांनी पथकाशी वाद घालत, जप्त केलेले साहित्य विक्रेत्यांना परत करण्यास भाग पाडले.


महापालिका व वाहतूक पोलिस शाखेकडून मुख्य बाजारपेठेतील झाशी चौक, बालाजी चौक, मारुती रोड, मेन रोड या परिसरातील अतिक्रमणे हटविण्याची मोहीम हाती घेण्यात आली. महापालिकेचे सहाय्यक आयुक्त एस. व्ही. पाटील, अतिक्रमण पथकाचे प्रमुख दिलीप घोरपडे, वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अतुल निकम यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम आखण्यात आली.

सकाळी अकरा वाजल्यापासून पथकाने जेसीबी व वाहनासह रस्त्यावर उतरून अतिक्रमणे काढण्यास सुरूवात केली. झाशी चौक ते बालाजी चौक या रस्त्यावरील दुकानांच्या छपऱ्या, हातगाडे हटविण्यात आले. त्यानंतर पथकाने आपला मोर्चा मेन रोडकडे वळविला. एका मिठाई दुकानदाराने रस्त्यावर शेड मारले होते. ते काढण्यात आले.

एका फूटवेअर विक्रेत्याने तर दिवाळीपासून शेड उभारले होते, तेही हटविण्यात आले. या रस्त्यावरील प्रत्येक दुकानासमोर फळविक्रेत्यांनी ठाण मांडले होते. अतिक्रमण पथक येताच हे विक्रेते गायब झाले होते.


त्यानंतर बालाजी चौक ते मारुती चौक या रस्त्यावरील अतिक्रमणांवर पथकाने हातोडा टाकला. अनेक दुकानदारांनी दुकानासमोर लोखंडी जाळी टाकली होती, ती जप्त करण्यात आली. काही फळ विक्रेत्यांचे साहित्यही पथकाने जप्त केले. दुकानाच्या छपऱ्या काढण्यात आल्या.

अगदी मारुती चौकापर्यंत विनातक्रार ही मोहीम सुरू होती. मारुती चौकात तुलसी विवाहाच्या पार्श्वभूमीवर झेंडू, ऊस व इतर साहित्य विक्रेत्यांनी रस्त्याच्या मधोमधच ठाण मांडले होते. पथकाने झेंडूची फुले ताब्यात घेतली, तसेच त्यांना हुसकावून लावले. या कारवाईमुळे मारुती चौक ते झाशी चौकापर्यंतच्या रस्त्याने मोकळा श्वास घेतला.


या मोहिमेत किरकोळ वादावादीचे प्रकार घडले, पण विनाअडथळा मोहीम सुरु होती. पण मारुती चौक ते विठ्ठल मंदिरापर्यंतचे अतिक्रमण काढताना एका नगरसेवकाने हस्तक्षेप केला. स्वाभिमानी आघाडीचे नगरसेवक बाळू गोंधळी यांच्यासह नगरसेविका पती हेमंत खंडागळे यांनी पथकाशी हुज्जत घातली. मारुती चौकापर्यंत मोहीम यशस्वी झाल्याने वाहतूक शाखा व शहर पोलिसांचे पथक परतले होते.


त्याचाच फायदा उठवित दोन्ही लोकप्रतिनिधींनी महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाला पिटाळून लावले. पथकाचे प्रमुख दिलीप घोरपडे यांच्याशी त्यांनी वाद घातला.

महापालिकेने जप्त केलेले साहित्यही त्यांनी विक्रेत्यांना परत करण्यास भाग पाडले. हे दोघे लोकप्रतिनिधी मदतीला आल्याचे पाहून विक्रेत्यांनाही चेव चढला. आतापर्यंत अतिक्रमण पथकाला साथ देणारे विक्रेतेही आक्रमक झाले. त्यामुळे या मोहिमेला नगरसेवक व नगरसेविका पतीच्या हस्तक्षेपामुळे ब्रेक लागला.


कारवाईत अडथळा : नगरसेवकावर कारवाई होणार का?

महापालिका व पोलिस प्रशासनाने बुधवारी संयुक्तरित्या अतिक्रमण विरोधी मोहीम हाती घेतली होती.मुख्य बाजारपेठेतील रस्त्यावर हातगाडी, फेरीवाले व फळविक्रेत्यांनी अतिक्रमण केल्याने सर्वसामान्य जनतेला अनेकदा चालत जाणेही मुश्किल होते.

या मोहिमेचे जनतेतून मोठ्या प्रमाणात स्वागत झाले. तसेच या मोहिमेत सातत्य असावे, अशी अपेक्षाही नागरिकांकडून व्यक्त होत होती. पण पुन्हा एकदा नगरसेवकांच्या हस्तक्षेपामुळे अतिक्रमण मोहिमेला ब्रेक लागला.

आता संबंधित नगरसेवक व नगरसेविका पतीवर मोहिमेत अडथळा आणल्याबद्दल महापालिका, पोलिसांकडून कारवाई होणार का? असा प्रश्न नागरिकांतून व्यक्त होत आहे. यापूर्वीही लोकप्रतिनिधींच्या हस्तक्षेपामुळे अतिक्रमण मोहिमा बारगळल्या होत्या. तसाच प्रकार आताही होऊ नये, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.
 

Web Title: During the anti-encroachment proceedings in Sangli, the controversy, the corporator has taken anti roles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.