चारुतासागर शासनदरबारी अजूनही उपेक्षितच : साहित्यरसिकांतून नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 11:02 PM2019-12-24T23:02:59+5:302019-12-24T23:03:30+5:30
तालुक्यातील देशिंग, हिंगणगाव येथे साहित्यसंमेलने दररवर्षी होतात. परंतु या संमेलनातूनही आजपर्यंत ठोसपणे चारुतासागर यांच्या स्मारकाची मागणी झालेली नाही किंवा तालुक्यातील साहित्यिकही या मागणीसाठी पुढे आले नाहीत. मळणगाव येथील चारुतासागर फौंडेशनच्यावतीने गावात त्यांच्या नावे अलीकडे साहित्य संमेलन भरवले जात आहे.
अर्जुन कर्पे ।
कवठेमहांकाळ : कसदार लेखणीने अभिजात साहित्याची निर्मिती करणारे ग्रामीण कथाकार चारुतासागर ऊर्फ दिनकर दत्तात्रय भोसले शासनदरबारी अजूनही उपेक्षितच आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यात त्यांचे स्मारक व्हावे, अशी मागणी साहित्यरसिक करत आहेत.
चारुतासागर कवठेमहांकाळ तालुक्यातील मळणगावचे. त्यांच्यामुळे हे गाव, तालुका मराठी साहित्य क्षेत्राच्या पटलावर माहीत झाला. चारुतासागर यांनी मामाचा वाडा, नागीण, नदीपार असे दमदार कथासंग्रह लिहिले. त्यांच्या दर्शन या कथेवर ‘जोगवा’ हा मराठी चित्रपट येऊन गेला. या चित्रपटाला पाच राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. त्यांनी स्त्रीजीवन, समाजातील उपेक्षित, वंचित, पीडित घटक यांचे सत्यकथन साहित्यातून मांडले. परंतु या साहित्यिकाच्या पदरी जिवंतपणीही आणि मरणोत्तरही उपेक्षाच आली आहे. त्यांना जाऊन दशक पूर्ण होत आले. परंतु त्यांच्या गावात, तालुक्यात त्यांचे साधे स्मारकही नाही. गावात त्यांच्या स्मारकाला जागा दिली आहे, परंतु ती गावाच्या बाहेर आहे.
तालुक्यातील देशिंग, हिंगणगाव येथे साहित्यसंमेलने दररवर्षी होतात. परंतु या संमेलनातूनही आजपर्यंत ठोसपणे चारुतासागर यांच्या स्मारकाची मागणी झालेली नाही किंवा तालुक्यातील साहित्यिकही या मागणीसाठी पुढे आले नाहीत.
मळणगाव येथील चारुतासागर फौंडेशनच्यावतीने गावात त्यांच्या नावे अलीकडे साहित्य संमेलन भरवले जात आहे. परंतु या संमेलनालाही तालुक्यातून पुरेसे अर्थसाहाय्य व प्रतिसाद मिळत नाही. ज्येष्ठ समीक्षक जी. के. ऐनापुरे यांनी मात्र ‘चारुतासागर : एक दु:खाचा गिरव’ हे समीक्षापुस्तक लिहून न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.
माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी चारुतासागर यांच्या स्मारकासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा शब्द दिला होता; मात्र त्यांच्या निधनानंतर त्यादिशेने लोकप्रतिनिधींची पावले पडताना दिसून येत नाहीत. मराठी साहित्य शिवारात अभिजात लेखणीने ग्रामीण जीवनाच्या वास्तवाची कथारूपी बीजे पेरणाऱ्या चारुतासागर यांना त्यांच्या पश्चात तरी न्याय मिळणार का, त्यांचे स्मारक होणार का, की या ‘जोगवा’काराच्या पदरात उपेक्षाचा जोगवाच पडणार, अशी भावना व्यक्त होत आहे.
चारुतासागर मराठी साहित्य क्षेत्रातील मोठे नाव आहे. त्यांचे कवठेमहांकाळ या तालुक्याच्या ठिकाणी स्मारक होणे गरजेचे आहे. त्यामध्ये वाचनालय, गं्रथालय असणे आवश्यक असून, यासाठी जिल्ह्यातील साहित्यिकांनी पुढे येण्याची गरज आहे.
-प्रा. जी. के. ऐनापुरे, ज्येष्ठ समीक्षक