ठाकरेंच्या दौऱ्यावेळी शिवसेनेत गटबाजीचा झेंडा
By admin | Published: May 2, 2016 11:42 PM2016-05-02T23:42:37+5:302016-05-03T00:41:13+5:30
दोन स्वतंत्र रॅल्या : डिजिटल फलकांवरही झाली नेत्यांची विभागणी, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम
सांगली : गटबाजीचे दीर्घकाळाचे ग्रहण घेऊन चालणाऱ्या सांगली जिल्ह्यातील शिवसेनेत उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यानिमित्तही पुन्हा गटबाजी उफाळली. दोन वेगवेगळ््या रॅल्या आणि डिजिटल फलकांवरील नेत्यांच्या विभागणीने येथील गटबाजी अधोरेखित केली आहे. गटबाजीचे निशाण फडकविले जात असतानाच ठाकरेंनी भर सभेत पश्चिम महाराष्ट्रातील शिवसेनेला सातत्याने मिळत असलेल्या अपयशावर बोट ठेवले.
अंतर्गत गटबाजीचा शिवसेनेचा सिलसिला जुना आहे. शिवसेनेचे पदाधिकारी बदलले, तरी गटबाजी कायम राहिली. ठाकरेंचा १ मे रोजीचा महाराष्ट्र दिनाचा दौराही या गटबाजीवर उतारा ठरू शकला नाही. दौऱ्याच्या नियोजनासाठी सांगलीच्या सर्किट हाऊसवर झालेल्या बैठकीत तात्पुरते ‘मिले सूर मेरा तुम्हारा’चे गीत गाण्यात आले. जुळलेले हे सूर ठाकरेंच्या आगमनावेळी पुन्हा बिघडले. मारुती चौकातून एक स्वतंत्र रॅली ठाकरेंच्या स्वागतासाठी निघाली. यामध्ये संभाजी पवारांचा गट सहभागी होता. दुसऱ्या गटाने थेट ठाकरेंना घेऊन त्यांची थाटात रॅली काढली. त्यावेळी शिवसेनेचा आणखी एक गट तसेच शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते दिसून आले. ठाकरेंच्या दौऱ्यानिमित्त लागलेले फलकही गटबाजीला अधोरेखित करीत होते.
वसंतदादा घराण्याला टक्कर देऊन राज्याच्या राजकारणात आपला ठसा उमटविणाऱ्या माजी आमदार संभाजी पवार यांनी विधानसभेवेळी शिवसेनेत प्रवेश केला असला, तरी शिवसेनेच्या जिल्ह्यातील मुख्य प्रवाहापासून त्यांना दूरच रहावे लागले. आजही पवारांच्या गटाचे शिवसेनेतील अस्तित्व स्वतंत्र आहे. भाजपमध्ये असताना राज्यातील अनेक नेत्यांकडून त्यांच्याप्रती आदरभाव व्यक्त होत होता. शिवसेनेत ज्या अपेक्षेने त्यांचा प्रवेश झाला, त्या अपेक्षांची पूर्तता होताना दिसत नाही. म्हणूनच पवार गटातील कार्यकर्ते सध्या सेनेतील राजकारणामुळे नाराज दिसत आहेत. संपर्कप्रमुख नितीन बानुगडे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची फौज मोठी असली तरी, ती पूर्ण नाही. ठाकरे यांच्या दौऱ्यावेळी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातींमधूनही विद्यमान आमदार अनिल बाबर, माजी आमदार संभाजी पवार असे दिग्गज नेते गायब होते. (प्रतिनिधी)
गटबाजीची कारणमीमांसा होणार कधी?
पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेला सातत्याने मिळत असलेल्या अपयशावर ठाकरे यांनी बोट ठेवले. सांगली जिल्ह्यापुरता विचार केला, तर शिवसेनेच्या अपयशामागे गटबाजी हेसुद्धा एक प्रबळ कारण आहे. याची कारणमीमांसा होताना आणि त्यातून सुधारणा होताना दिसत नाही. त्यामुळेच अपयशाचा सिलसिला कायम आहे.