कोरोनाकाळात मिळालेले दीडशेवर व्हेंटिलेटर्स झाले भंगार, कोट्यवधी रुपये पाण्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2023 05:50 PM2023-08-04T17:50:34+5:302023-08-04T17:50:57+5:30
सदोष सॉफ्टवेअर, निकामी सेन्सर्स
सांगली : कोरोनाकाळात ‘पीएम केअर’ निधीमधून जिल्ह्याला तब्बल १५२ व्हेंटिलेटर्स मिळाले, पण त्यातील बरेच बिनकामाचे ठरले आहेत. मोठा गाजावाजा करून मिळालेले कोट्यवधी रुपये किमतीचे व्हेंटिलेटर्स आजही विविध शासकीय रुग्णालयांत धूळ खात पडून आहेत.
आरोग्य यंत्रणेने काही व्हेंटिलेटर्स जुगाड करून कार्यान्वित केले, पण आता कोरोना संपल्यावर त्यांचे रूपांतर अक्षरश: भंगारात झाले आहे. कोरोनाकाळात व्हेंटिलेटरबाबत जिल्ह्याची स्थिती आणीबाणीची होती. व्हेंटिलेटर बेडअभावी अनेकांना प्राणास मुकावे लागले. कोरोनाच्या धांदलीत म्हणजे एप्रिल २०२१ मध्ये ‘पीएम केअर’मधून एकदम १५२ व्हेंटिलेटर मिळाले. त्यामुळे आरोग्य यंत्रणेला दिलास मिळाला; पण व्हेंटिलेटर्सचे खरे स्वरूप पुढे येताच आनंदावर विरजण पडले. सदोष व्हेंटिलेटर्स म्हणजे ‘असून अडचण आणि नसून खोळंबा’ ठरली.
त्यांची दुरुस्ती स्थानिक स्तरावर शक्य नव्हती. नादुरुस्तीच्या कारणास्तव परत पाठविल्यास पुन्हा लवकर मिळण्याची सुतराम शक्यता नव्हती. त्यामुळे जुगाड करून वापरात आणणे हा एकमेव पर्याय होता. शासकीय रुग्णालयाच्या अभियंत्यांनी कसब पणाला लावून त्यामध्ये प्राण फुंकले. कसरत करत वापरले.
पुरवठादार कंपनीने व्हेंटिलेटर्ससाठी वॉरंटी कालावधी दिला होता; पण कोरोनाच्या धांदलीच्या काळात ती दुरुस्तीसाठी कंपनीकडे परत पाठविणे किचकट काम होते. लवकर दुरुस्तीचीही शक्यता नव्हती. त्यामुळे तशीच वापरण्याचा प्रयत्न केला. कोरोना संपल्यावर त्यांचे महत्त्व कमी झाले. तातडीची बाब म्हणून शासनाने प्रत्येक रुग्णालयाला तात्पुरत्या स्वरूपात जैववैद्यकीय अभियंता नेमून व्हेंटिलेटर्स दुरुस्त करून घेण्यास सांगितले होते. सांगली, मिरजेतील रुग्णालयांत दुरुस्त्या झाल्या, पण कवठेमहांकाळ, तासगाव, आदी ग्रामीण रुग्णालयांत मात्र सगळाच सावळागोंधळ होता.
अनेक दोष
या व्हेंटिलेटर्समध्ये अनेक दोष आहेत. काहींच्या सेन्सरमध्ये बिघाड आहे. मिरज कोविड रुग्णालयात बसविलेल्या २० व्हेंटिलेटर्समध्ये सॉफ्टवेअरची समस्या होती. काही तास-दोन तासांतच बंद पडायचे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना डोळ्यांत तेल घालून त्यावर लक्ष ठेवायला लागायचे. रुग्णालयाने मोठी झटापट करून ते सुरू करण्यात यश मिळविले. रुग्णांचे प्राण वाचविले.
युपीएस काढले, सांगाडे राहिले
कोरोनाचा ताण कमी झाल्यावर काही तंदुरुस्त व्हेंटिलेटर्स नियमित रुग्णांसाठी वापरात आणले आहेत. उर्वरित व्हेंटिलेटर्सची वीजपुरवठा यंत्रणा (युपीएस) काढून अन्य उपकरणांसाठी वापरात आणली आहे. व्हेंटिलेटर्सचे सांगाडे मात्र पडून आहेत.