वाळवा-शिराळ्यात काँग्रेसचे मोसमी वारे
By admin | Published: June 26, 2016 11:37 PM2016-06-26T23:37:35+5:302016-06-27T00:36:58+5:30
निवडणुकीपुरतीच नेत्यांना येते जाग : स्थानिक पातळीवर सक्षम नेतृत्वाचा अभाव
अशोक पाटील --इस्लामपूर --वाळवा, शिराळ्यातील काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांची अवस्था मोसमी वाऱ्यासारखी झाली आहे. शिराळ्यात काँग्रेसचा गड अबाधित ठेवण्यात देशमुख पिता—पुत्र सक्रिय आहेत. याउलट वाळवा तालुक्यातील नेते फक्त निवडणुकीपुरते एकत्र येऊन निवडणुकीची हाक देतात. या हाकेला माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम, माजी आमदार सदाशिवराव पाटील, माजी आमदार हाफिज धत्तुरे, आनंदराव माने यांच्यासह सत्यजित देशमुख यांनी साद दिली आहे. शिराळा तालुक्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विधानपरिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख, त्यांचे पुत्र सत्यजित देशमुख यांनी काँग्रेसची ताकद टिकविण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे. शिराळ्यातील स्थानिक राजकारणात त्यांची ताकद निर्णायक असली तरी ती पक्षाला पुरेसे यश मिळवून देऊ शकत नाही. यामुळे देशमुख यांनी राष्ट्रवादीचे मानसिंगराव नाईक यांच्याशी मिळतेजुळते घेतले आहे.
परंतु पक्षआदेशामुळे जिल्हा परिषद, विधानसभा निवडणुकीत या दोघांना स्वतंत्ररित्या निवडणूक लढवावी लागली. त्यामुळे काँग्रेसला मोठा फटका बसला.
याचा फायदा अनेक पक्ष फिरलेल्या शिवाजीराव नाईक यांना झाला. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर मानसिंगराव नाईक व सत्यजित देशमुख एकत्र येणार का? असा प्रश्न आहे. कारण माजी मंत्री जयंत पाटील आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांनीही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढविण्याची भाषा सुरू केली आहे.
शिराळ्यापेक्षा वाळव्यातील काँग्रेसची स्थिती अत्यंत बिकट आहे. सर्व नेत्यांचे चेहरे फक्त पावसाळ्यात बाहेर पडणाऱ्या बेडकांप्रमाणे निवडणुकीपुरतेच दिसतात. वाळवा तालुक्याचे काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, सांगली जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष, माजी आमदार सदाशिवराव पाटील आणि सत्यजित देशमुख यांना इस्लामपूर येथील सभेसाठी आमंत्रित केले होते. त्यांनीही आवर्जून आपली उपस्थिती दाखवून जयंत पाटील यांना टार्गेट करीत, झोपलेल्या काँग्रेस नेत्यांना कानमंत्र दिला आहे. आता यातून ते किती रिचार्ज होणार यावर पुढील गणित अवलंबून आहे.
या नेत्यांच्या भाषणबाजीतून जयंत पाटील यांना मोठे आव्हान निर्माण करण्याचा सूर निघाला असला, तरी स्थानिक पातळीवर सक्षम नेतृत्वाचा अभाव असल्याने हे कितपत शक्य होते, हे येणारा काळच ठरवणार आहे.
नेते कार्यक्रमापुरतेच : पदाधिकारी नामधारी
वाळवा तालुक्यात तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील, माजी जि. प. सदस्य जितेंद्र पाटील, सी. बी. पाटील, जयराज पाटील, वैभव पवार, विजय पवार या नावांनंतर काँग्रेस थांबते. उर्वरित पदाधिकाऱ्यांची नावे सामान्यांना माहिती नाहीत. कालच्या मेळाव्यास उपस्थित असलेले अॅड. एच. के. पाटील, जयकर कदम, प्रवक्ते संतोष पाटील, जिल्हा सरचिटणीस सतीश पाटील, प्रा. हेमंत कुरळे, शिवाजीराव निळकंठ, आनंदराव पाटील, प्रतापराव मोरे, धनंजय कुलकर्णी, किरण चव्हाण हे काँग्रेसच्या पटावर कधीच दिसत नाहीत. गेल्या काही वर्षात त्यांच्याकडून पक्षासाठी उल्लेखनीय कार्य झाल्याचे निदर्शनास येत नाही. एखाद्या मेळाव्याला अथवा कार्यक्रमालाच त्यांची उपस्थिती दिसते.