दत्त इंडिया देणार एकरकमी एफआरपी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:22 AM2021-01-09T04:22:12+5:302021-01-09T04:22:12+5:30
जिल्ह्यातील कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये एफआरपीबाबत कडेगाव येथे बैठक झाली होती. त्यावेळी एकरकमी एफआरपी देण्याचे सर्वच साखर कारखानदारांनी ...
जिल्ह्यातील कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये एफआरपीबाबत कडेगाव येथे बैठक झाली होती. त्यावेळी एकरकमी एफआरपी देण्याचे सर्वच साखर कारखानदारांनी मान्य केले होते. मात्र हंगाम सुरू होऊन दोन महिने झाले तरी सोनहिरा, उदगिरी शुगर आणि दालमिया वगळता उर्वरित एकाही कारखान्याने एकरकमी एफआरपी न देता, दोन, तीन हप्त्यांमध्ये बिल देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
वसंतदादा कारखाना चालवित असलेल्या दत्त इंडिया कंपनीनेही पहिला हप्ता २५०० रुपये दिला असून, उर्वरित ३९२ रुपयांचा दुसरा हप्ता प्रलंबित आहे. याप्रकरणी कंपनीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गव्हाणीत उड्या मारणार असल्याबाबत निवेदन दिले होते. तरीही प्रशासनाने कोणतीच कार्यवाही केली नव्हती. अखेर शुक्रवारी महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गनिमी काव्याने दत्त इंडिया कारखान्याच्या गव्हाणीत उड्या मारण्यासाठी कारखान्यावर धडक मारली; पण कारखान्याकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर कडक पोलीस बंदोबस्त तैनात होता. बॅरिकेट्स लावून रस्ता अडवला होता. दुपारी बाराच्या सुमारास कार्यकर्त्यांना कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारावरच पोलिसांनी अडवले. कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाली. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. त्यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.
दत्त इंडिया कंपनीचे उपाध्यक्ष मृत्युंजय शिंदे, व्यवस्थापक शरद मोरे यांनी आंदोलनस्थळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यावेळी उर्वरित बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर दहा दिवसांत वर्ग केली जातील. तसेच यापुढील ऊस गाळपास येणाऱ्या उसासाठी शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी दिली जाईल, असे आश्वासन कंपनीने दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
आंदोलनात संदीप राजोबा, पोपट मोरे, संजय बेले, भागवत जाधव, भरत चौगुले, श्रीधर उदगावे, राजेंद्र माने, बाळासाहेब जाधव, महेश जगताप, राजू परीट, प्रताप पाटील, संतोष शेळके, काशिनाथ निंबाळकर, मारुती देवकर, दीपक मगदूम आदींसह शेतकरी सहभागी होते.