माता-पित्यांच्या सेवेचे कर्तव्य चोख बजवावे
By admin | Published: June 18, 2015 11:52 PM2015-06-18T23:52:11+5:302015-06-18T23:53:12+5:30
संविदानंद सरस्वती : लोकज्योती ज्येष्ठ नागरिक संघाच्या वर्धापनदिनी तरुणांना सल्ला
नाशिक : आपणही एक दिवस ज्येष्ठ नागरिक होणार असून, आपल्यालाही आपल्या मुलांचा आधार भासणार आहे, या विचाराने तरुण पिढीने आपल्या वृद्ध माता-पित्यांच्या सेवेचे कर्तव्य चोखपणे बजवावे, असा सल्ला कैलास मठाचे प्रमुख स्वामी संविदानंद सरस्वती यांनी दिला.
निमित्त होते, महाकवी कालिदास कलामंदिरामध्ये आयोजित लोकज्योती ज्येष्ठ नागरिक संघाचे वर्धापनदिन सोहळ्याचे. या कार्यक्रमाप्रसंगी संविदानंद प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी ते म्हणाले, आयु, विद्या, यश आणि बल या चार गोष्टींचे जीवनामध्ये आपोआप प्राप्ती होण्यासाठी वडीलधाऱ्यांचा आदर व सन्मान गरजेचाच आहे. मुलांनी आपल्या माता-पित्यांसह वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घेत जीवनामध्ये यशोशिखर गाठावे. तणाव व चिंताग्रस्त जीवनात सुखी-समाधानी राहण्यासाठी आई-वडिलांची सेवा हा एकमेव मार्ग असल्याचे संविदानंद महाराज यांनी सांगितले. यावेळी व्यासपीठावर आमदार सीमा हिरे, ज्येष्ठ पत्रकार शरद बुरकुले, डॉ. तुषार देवरे, मंचाचे अध्यक्ष रमेश देशमुख, कर्नल अचल श्रीधरण, डी. एम. कुलकर्णी यांच्यासह सत्कारार्थी ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
दरम्यान, दिव्य मराठीचे निवासी संपादक जयप्रकाश पवार, गावकरीचे संचालक, संपादक विश्वास देवकर, पुण्यनगरीचे निवासी संपादक कैलास ढोले यांना प्रदीर्घकाळ पत्रकारिता केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविक देशमुख यांनी केले व सूत्रसंचालन सीमा पेठकर यांनी केले. (प्रतिनिधी)