तासगावात जळण तोडताना विहिरीत पडून सख्ख्या बहिणींचा मृत्यू
By admin | Published: November 16, 2015 11:38 PM2015-11-16T23:38:46+5:302015-11-16T23:58:39+5:30
दोघीही गर्भवती होत्या. ही घटना सोमवारी दुपारी बारा ते एकच्यादरम्यान घडली.
तासगाव : तोल जाऊन विहिरीत पडल्याने तासगाव येथील सख्ख्या बहिणींचा बुडून मृत्यू झाला. दोघीही गर्भवती होत्या. ही घटना सोमवारी दुपारी बारा ते एकच्यादरम्यान घडली. काजल दीपक जाधव (वय २१) आणि अमिना सचिन जाधव (२०, दोघीही गोसावी वस्ती, तासगाव) अशी मृत भगिनींची नावे होती. सांगली येथील जीवरक्षक दलाच्या कार्यकर्त्यांनी दोन्ही मृतदेह बाहेर काढले. मुलींचे वडील धनू रामचंद्र शिंदे (रा. गोसावी गल्ली, तासगाव) यांनी तासगाव पोलिसांत फिर्याद दिली आहे.
याबाबत तासगाव पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की, सोमवारी दुपारी बारा ते एक वाजण्याच्या सुमारास अमिना जाधव व काजल जाधव या दोन्ही बहिणी सरपण आणण्यासाठी तासगाव-सांगली रस्त्यावरील दुर्गे पेट्रोल पंपाजवळ गेल्या होत्या. या ठिकाणी त्या वाळलेले जळण काढत होत्या. त्यावेळी शेजारी असणाऱ्या संदीप दीपचंद शहा यांच्या विहिरीजवळ जळण तोडत असताना त्यांचा तोल गेला. एकमेकींना सावरण्याच्या नादात दोन्ही बहिणी विहिरीत पडल्या आणि बुडाल्या. दोघीही सहा महिन्यांच्या गरोदर होत्या. दोघींचे सासर व माहेरही तासगावच आहे. घटनास्थळी व ग्रामीण रुग्णालयात मृतांच्या नातेवाइकांनी मोठी गर्दी केली होती. महिलांचा आक्रोश सुरू होता. घटनास्थळी तासगावचे पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे व सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी भेट दिली. जीवरक्षक टीमला पोलिसांनी पाचारण केले. या टीमने मृतदेह बाहेर काढले. जीवरक्षक टीममधील महंमद तांबोळी, युवराज कदम, महेश परमणे, संतोष कुरणे, श्रीपाल मद्रासी, शरद नांद्रेकर, गणेश कटीमणी यांनी मृतदेह बाहेर काढले. कृष्णात पिंगळे यांनी जीवरक्षक टीमचा सत्कार करून पोलिसांना सहकार्य केल्याबद्दल आभार मानले. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन वसमळे करीत आहेत. (वार्ताहर)