सांगलीत लवकरच ई-बससेवा, केंद्रीय समितीकडून हिरवा कंदील; पहिल्या टप्प्यात ५० बसेस धावणार
By शीतल पाटील | Published: October 4, 2023 04:43 PM2023-10-04T16:43:41+5:302023-10-04T16:45:52+5:30
शहरासह ग्रामीण भागात सेवा
सांगली : महापालिकेकडून ई बस सेवा सुरू करण्याच्या हालचाली गतीमान झाल्या आहेत. सामाजिक संघटना, तज्ज्ञांचे मत जाणून घेण्यासाठी शनिवारी बैठक होत आहे. पहिल्या टप्प्यात ५० बसेस शहरातील रस्त्यावर धावणार असून प्रशासनाने बस मार्गाचे नियोजन केल्याचे आयुक्त सुनील पवार यांनी सांगितले.
याबाबत आयुक्त पवार म्हणाले की, ई बससेवा सुरू करण्यापूर्वी त्यातील अडचणी, नागरिकांची मते जाणून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी शनिवारी सामाजिक संघटना, नागरिक व तज्ज्ञांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला कोल्हापूर परिवहन विभागाचे संजय इनामदार, नवी मुंबईचे परिवहन व्यवस्थापन योगेश कडुसकर, कल्याण-डोंबिवलीचे दीपक सावंत, प्रभारी आरटीओ प्रशांत साळे, वाहतूक निरीक्षक मुकूंद कुलकर्णी मार्गदर्शन करणार आहेत.
नुकतेच केंद्र शासनाकडून नियुक्त केलेल्या कन्व्हर्जन्स एनर्जी सर्व्हिसेस लिमिटेड, असोसिएशन ऑफ स्टेट रोड ट्रान्सपोर्ट समितीने हिरवा कंदील दाखविला आहे. पहिल्या टप्प्यात ५० बसेस सुरू करण्याचा विचार असल्याचे पवार यांनी सांगितले.
टिंबर एरियात बस डेपो
टिंबर एरियातील शाळा नंबर २२ जवळील महापालिकेच्या मालकीच्या जागेत ई बस डेपो व चार्जिंग स्टेशन सुरू करण्यात येणार आहे. लांब पल्ल्यासाठी स्टॅण्डर्ड तर शहरासाठी मिनी बसेस घेण्याचा विचार सुरू आहे.
शहरासह ग्रामीण भागात सेवा
ई बससेवेच्या मार्गाची निश्चित झाली आहे. ३९ रुट निश्चित केले आहेत. त्यात शहरासह ग्रामीण भागाचा समावेश आहे. अंकलखोप, डिग्रज, नवी धामणी, आरग, बेडग, नृसिंहवाडी, दानोळी, कोथळी, म्हैसाळ, बोलवाड, मालगाव, बुधगाव, काननवाडी या आसपासच्या २० ते २५ किलोमीटर अंतरावरील गावासाठी बससेवा दिली जाणार आहे.