ई पास म्हणजे न्हाणीला बोळा आणि दरवाजा सताड मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:23 AM2021-04-26T04:23:30+5:302021-04-26T04:23:30+5:30
सांगली : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने जिल्हाबंदी लागू केली असली तरी चोरवाटांनी घुसखोरी सुरूच आहे. विशेषत: कर्नाटक व सोलापूर ...
सांगली : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने जिल्हाबंदी लागू केली असली तरी चोरवाटांनी घुसखोरी सुरूच आहे. विशेषत: कर्नाटक व सोलापूर जिल्ह्यांतून दुचाकीवरून जिल्ह्यात प्रवेश सुरूच आहे. आडवाटांवर पोलिसांचा बंदोबस्त नसल्याचा पुरेपूर फायदा उठविला जात आहे.
जिल्ह्यात प्रवेशासाठी पोलिसांना ई पासची व्यवस्था केली आहे. त्यासाठी सबळ कारण द्यावे लागते. कोल्हापूर-सांगली रस्त्यावर अंकली व उदगाव हद्दीत पोलीस तपासणी नाके आहेत. तेथे पास पाहूनच सोडले जाते. अन्यत्र तशी स्थिती नाही. कर्नाटकातून येण्यासाठी अनेक चोरवाटा आहेत. तेथून जिल्ह्याच्या हद्दीत आले की, सांगली-मिरज शहरांत प्रवेश सहज शक्य होतो. शहराच्या सर्वच मुख्य रस्त्यांवर पोलीस बंदोबस्त असला तरी काटेकोर तपासणी केली जात नाही. कर्नाटकातून मिरजेपर्यंत आल्यावर गल्लीबोळांतून सांगलीकडे शिरकाव करता येतो. मिरजेपासून विश्रामबागपर्यंत ठिकठिकाणी पोलिसांचे ताफे आहेत; पण प्रवाशांची विचारणा होत नाही. लॉकडाऊनच्या पहिल्या दोन दिवसांतील पोलिसांचा उत्साह कधीच मावळला आहे. तुमच्या दुचाकीवर महाराष्ट्र पासिंगचा क्रमांक असला की जिल्ह्यात निवांत घुसता येते.
सोलापूर जिल्ह्यातून दुपारी, रात्री किंवा पहाटे सांगली-मिरजेत शिरता येते. पोलीस तपासणीचा यावेळी पत्ता नसतो. कोल्हापूर जिल्ह्यातील कनवाडमधून म्हैसाळ बंधारामार्गे दररोज अनेक दुचाकी जिल्ह्यात शिरत असतात. पुढे त्यांचा सांगली-मिरजेतील प्रवास विनाअडथळा होताे. अंकलीमधून उदगावमार्गे कृष्णाघाटावर दुचाकीस्वार येतात. पुलावर बंदोबस्ताचा पत्ता नाही, तेथून मिरजेत निवांत शिरता येते.
फोटो १
शहरासाठीचा मुख्य रस्ता गारमेंट चाैकातून येतो. येथे पोलीस बंदोबस्त तैनात असतो. येणाऱ्या-जाणाऱ्यांची तपासणी होते. प्रसंगी ई पासचीही विचारणा होते. कोल्हापुरातून इस्लापूरमार्गे शहरात येऊ पाहणाऱ्यांची येथे नाकेबंदी होते.
फोटो २
कोल्हापूर जिल्ह्यातून येणाऱ्यांची अंकली नाक्यावर तपासणी होते. पास नसल्यास सांगलीत प्रवेश दिला जात नाही. येथून जवळच उदगावमध्ये कोल्हापूर पोलिसांचा बंदोबस्त आहे, तेथेही कोल्हापुरात जाणाऱ्यांना पासशिवाय पुढे सोडले जात नाही.
फोटो ३
सांगलीत कर्मवीर चौकात वाहनचालकांची तपासणी होते. अधिकृत कारण नसल्यास दंडाची पावती फाडली जाते; पण असा कडक बंदोबस्त दिवसभर दिसत नाही.
फोटो ४
बॉक्स
पाच रस्ते, १०० पोलीस
- सांगली शहरात येण्यासाठी मिरज, तासगाव, पलूस, पेठ, कोल्हापूर हे पाच मुख्य रस्ते आहेत. या रस्त्यांवर बंदोबस्त आहे, प्रवाशांची तपासणीही सुरू असते.
- कोल्हापूरकडून येणाऱ्यांची अंकलीमध्येच अडवणूक होते. ई पासशिवाय प्रवेश मिळत नाही. हाच निकष एसटीला मात्र लावला जात नाही. एसटीचे प्रवासी मात्र बिनबोभाट जिल्हाबंदीलाही उलथवून लावतात.
- सांगलीवाडी, माधवनगर जकात नाका येथेही पोलिसांकडून विचारणा केली जाते. तासगावकडून सांगलीत येणाऱ्यांची माधवनगरमध्ये नाकेबंदी केली जाते; पण हा बंदोबस्त २४ तास नसतो.