यशवंतराव चव्हाण यांच्या स्मारकासाठी पावणेआठ कोटी
By admin | Published: April 7, 2017 12:14 AM2017-04-07T00:14:30+5:302017-04-07T00:14:30+5:30
यशवंतराव चव्हाण यांच्या स्मारकासाठी पावणेआठ कोटी
सातारा : ‘जिल्हा परिषदेमध्ये महाराष्ट्राचे शिल्पकार दिवंगत यशवंतराव चव्हाण यांचे स्मारक उभारण्यासाठी शासनाने सात कोटी ६९ लाख रुपयांचा निधी जिल्हा परिषदेकडे वर्ग केला आहे,’ अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनी दिली.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, कार्यकारी अभियंता संजय पाटील यांनी नुकताच विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्याशी या विषयावर विचारविनिमय केला होता. त्याअनुषंगाने रामराजेंनी मंत्रालयातील संबंधित विभागांची संयुक्त बैठक घेऊन जिल्हा परिषदेकरिता हा निधी देण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या शासन निर्णयानुसार दिवंगत यशवंतराव चव्हाण यांचे स्मारक बांधण्यासाठी सात कोटी ६९ लाख रुपये जिल्हा परिषदेला वितरित केले.
सातारा जिल्हा परिषदेमार्फत शासनाने दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मरणार्थ बहुउद्देशीय सभागृह बांधले आहे. शासनाने दहा कोटी मंजूर केले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या आवारात १२०० आसन क्षमतेचे वातानुकूलित बहुउद्देशीय सभागृह बांधण्यात आले. त्यामध्ये सर्व कक्ष वातानुकूलित केले आहेत. या सभागृहासाठी २२ कोटींचा सविस्तर आराखडा शासनाला सादर केला होता. दरम्यान, नव्याने मिळालेल्या अनुदानातून प्रदर्शन दालन, बैठक व्यवस्थेकरिता दोन हॉल, स्वागत कक्ष, ग्रंथालय, विश्रामगृह, आदी बाबी करण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)