दसऱ्याला कमावलं; दिवाळीत गमावलं!
By admin | Published: November 16, 2015 09:21 PM2015-11-16T21:21:38+5:302015-11-17T00:02:49+5:30
शेतकऱ्यांचे नुकसान दर कोसळल्याने कोमेजला झेंडूचा लाल, पिवळा गोंडा
पुसेगाव : पिवळा गोंडा म्हणून शेतात डोलणाऱ्या झेंडूने ऐन दिवाळीत शेतकऱ्यांच्या घरावर यावर्षी दु:खाचे तोरण बांधले. दसऱ्याला भलताच भाव खाणारा झेंडू दिवाळीत अक्षरश: पायदळी गेला. दर कोसळल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. भांडवलही वसूल न झाल्याने झेंडू उत्पादकांत चिंंतेचे वातावरण आहे.
जिल्ह्याच्या पूर्व भागात काटेवाडी, पुसेगाव, बुध, वर्धनगड, पवारवाडी या भागांत झेंडूच्या फुलांची लागवड मोठ्या प्रमाणात झाली होती. दरवर्षी या पट्ट्यात झेंडूंची लागवड होतेच; पण यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना या लागवडीचा मोठा फटका बसला. इनिव्हा, मॅक्सिमा, इनिव्हा आॅरेंज, इनिव्हा यलो, टॉल आॅरेंज, भगवती या वाणांची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती. झेंडूचे पीक तीन महिन्यांत तयार होते. सामान्यत: दसरा-दिवाळीच्या तोंडावर तोड करता येईल, अशा बेताने लागवड करण्यात येते.
यावर्षी दसऱ्याला समाधानकारक उत्पन्न मिळाले, तरीही दिवाळीत लक्ष्मीपूजनालाच लक्ष्मी शेतकऱ्यावर रुसली. वेगवेगळ्या कारणांनी झेंडूचे दर गडगडल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.
झेंडूची तोड झाल्यानंतर तो विकायला बाजारपेठेत जाणे प्रत्येक शेतकऱ्याला जमते, असे नाही. अनेक शेतकरी आपला झेंडू शहरात पाठवून देतात. यावर्षी काहींनी आपला माल पुण्या-मुंबईच्या बाजारपेठेला पाठवून दिला. तर काहींनी जवळचा तालुका, जिल्ह्याच्या ठिकाणी झेंडू पाठविला. प्रवासात पोती एकावर एक रचल्याने फुले दबून नुकसान झाले. या फुलांना दर कमी मिळतो. दसऱ्याला पुणे मार्केटमध्ये शंभर रुपये किलोप्रमाणे विकणारा झेंडू दिवाळीत १५ ते २० रुपये किलोने विक्री करण्याशिवाय शेतकऱ्यांकडे कोणताही पर्याय नव्हता. त्यामुळे भागातील शेतकरी अडचणीत आला आहे. काही जणांनी आपल्याच शेताच्या कडेला बसून रस्त्यावर फुलांची विक्री सुरू केली होती. परंतु, त्यांनाही अत्यल्प मागणीमुळे नुकसान सोसावे लागले आहे. दिवाळीत ही पट्टी इतकी कमी झाली की अनेकांचा खर्चही भरून निघाला नाही. त्यामुळे चिंतेचे वातावरण आहे.
काहीजणांना तर फुलांच्या किमतीपेक्षाही अधिक खर्च सांगितला गेला. काही वेळा व्यापारी विक्रीची खरी किंंमत शेतकऱ्यांना कळू देत नाहीत. त्यामुळे अंतिमत: शेतकऱ्यांचेच नुकसान होते. यावर्षी अनेकांना दिवाळीच्या वेळीची फुलाच्या विक्रीची पट्टी अनेक पटीने कमी आली आहे. काही शेतकऱ्यांना तर खर्चापोटी ‘पाचशे रुपये तुम्हीच आम्हाला पाठवून द्या,’ असा उलटा निरोप शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांकडून आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या विवंचनेत भर पडली आहे. दसऱ्याला खुललेली झेंडूची कळी दिवाळीत कोमेजल्याने नुकसान झाले. (वार्ताहर)
निर्सगाच्या लहरीपणाचा फटका
झेंडूच्या पिकांना यंदा निर्सगानेही दणका दिला. परतीच्या पावसाने वातावरण बदलून गेले. अशा बदलांमुळे झेंडूच्या झाडावर करपा पडतो. झाडाची पाने करपून वाढ खुंटते. यामुळेही अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तरी मागणीपेक्षा पुरवठा खूपच अधिक झाल्याने अनेकांवर फुले रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली.
दसऱ्याच्या सणाला जो दर झेंडूच्या फुलांना मिळाला, तसा दिवाळीला मिळाला असता तर काहीतरी पदरात पडले असते. निर्सगाची अवकृपा आणि व्यापाऱ्यांकडून होणारी पिळवणूक यामुळे शेतकरी अक्षरश: मेटाकुटीस आला आहे.
-अक्षय गोरे, झेंडू उत्पादक शेतकरी पुसेगाव
असा आहे
लागवडीचा खर्च...
एका एकरात झेंडूच्या
८ हजार झाडांची लागवड
एका रोपांची किंमत
१.७० ते १.९० रुपये
एकरी २० हजार रुपये
रोपांवर खर्च
भर घालणे, भांगलणे अशा कामांसाठी मजुरीवर एकरी
१० हजार खर्ची
औषध फवारणीचा खर्च सुमारे
८ हजार रुपये
तोडणी, वाहतूक अशा आनुषंगिक बाबीवर सुमारे १० हजार रुपये खर्च अपेक्षित
झेंडू ज्या बारदाण्यातून बाजारात नेला जातो, त्याची किंंमत प्रत्येकी १२ रुपये ते १५ रुपये
एवढे करून मिळालेल्या दरातून हमाली, तोलाई