सांगली : चांदोली परिसरात भूकंपाचे धक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2021 12:15 PM2021-11-15T12:15:34+5:302021-11-15T12:18:39+5:30
सांगली जिल्ह्यातील चांदोली परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. आज, सोमवारी (दि.१५) पहाटे २ वाजून ३६ मिनिटांनी चांदोली धरण व परिसरात ३.२ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का जाणवला.
शिराळा - ऐन गुलाबी थंडीत महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाचे आगमन झाले असतानाच आज सांगली जिल्ह्यातील चांदोली परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. आज, सोमवारी (दि.१५) पहाटे २ वाजून ३६ मिनिटांनी चांदोली धरण व परिसरात ३.२ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का जाणवला. वारणा पाटबंधारे विभाग वारणाचे शाखाधिकारी टी. एस. धामणकर यांनी याबाबत माहिती दिली.
ते म्हणाले, भूकंपाचा हा धक्का वारणावती व चांदोली वारणा धरण परिसरात जाणवला आहे. या भूकंपाच्या धक्क्याचे स्वरूप सौम्य स्वरूपात असल्याने परिसरात कोणतीही आर्थिक अथवा जिवितहानी झाली नाही.
सांगली जिल्ह्याबरोबरच रत्नागिरीतही भूकंपाचे धक्के बसले. रत्नागिरी जिल्ह्यातील चोरवणे, पाली, साखरपा, संगमेश्वर परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.