बाजार समित्यांचे आर्थिक प्रश्न बिकट-- जयंत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 12:18 AM2017-09-17T00:18:13+5:302017-09-17T00:18:45+5:30
इस्लामपूर : बाजार समितीचे अधिकार मर्यादित केल्याने, आर्थिक अडचणी वाढल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : बाजार समितीचे अधिकार मर्यादित केल्याने, आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. शेतकºयांची लुबाडणूक टाळण्यासाठी ई-प्लॅटफॉर्मसारखा शाश्वत पर्याय शासन देऊ शकलेले नाही, असा आरोप आमदार जयंत पाटील यांनी केला. इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती उत्पन्न वाढीसारख्या आव्हानांना तोंड देत कायम अग्रेसर राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
येथील बाजार समितीच्या सभागृहात झालेल्या वार्षिक सभेत आ. जयंत पाटील यांनी मार्गदर्शन केले. सभापती आनंदराव पाटील अध्यक्षस्थानी होते. उपसभापती सुरेश गावडे, पं. स. सभापती सचिन हुलवान यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी राष्टÑवादीचे तालुकाध्यक्ष विजय पाटील, जिल्हा नियोजन समिती सदस्य झुंजारराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला. सभेपुढील सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले.
आ. पाटील म्हणाले, उत्पन्नाचे स्त्रोत वाढवणे हे राज्यातील बाजार समित्यांपुढील मोठे आव्हान आहे. सध्या बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकºयांसह हमाल वर्ग अडचणीत आहे. कामगारांचे पगार होणे अवघड बनले आहे. त्यामुळे बाजार समितीने उलाढाल वाढवण्यावर भर द्यावा.
आष्टा येथे हळद सौदे सुरु करुन १४ कोटींवर उलाढाल केली आहे. आमदार-खासदारांकडून विविध सुधारणांसाठी निधी मिळत असेल, तर त्याचे स्वागत व्हायला हवे.
सभापती पाटील म्हणाले, गेल्यावर्षी २ लाखांचा, तर यंदा मात्र आम्ही १२ लाखांवर वाढावा घेण्यात यशस्वी ठरलो. आ. जयंत पाटील, माजी आ. विलासराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ताकारी बाजार आवारात सव्वा कोटी रुपये खर्चून पायाभूत सुविधा देत आहोत.
जि. प. सदस्य संजीव पाटील यांनी चिकुर्डे येथे जनावरांचा बाजार करण्याची सूचना केली. विजय पवार यांनी बाजार आवारातील रस्त्यांसाठी ७ लाखांचा निधी दिल्याबद्दल खा. राजू शेट्टींच्या अभिनंदनाचा, तर भरत पाटील यांनी बाजार समितीसाठी शेतकºयांना मतदानाचा अधिकार दिल्याबद्दल कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. ते मंजूर करण्यात आले.
यावेळी पवार यांनी, ४० टनी वजन काट्यासाठी खा. शेट्टी यांनी १६ लाख रुपये, तर आमदार मोहनराव कदम यांनी रस्त्यासाठी ५ लाख रुपये देऊनही त्यांच्या अभिनंदनाचा ठराव सत्ताधाºयांनी मांडला नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली.
संचालक अल्लाउद्दीन चौगुले यांनी स्वागत केले. सचिव विजय जाधव यांनी विषयपत्रिका, इतिवृत्ताचे वाचन केले. कलगोंडा पाटील यांनी श्रध्दांजलीचाठराव मांडला. यावेळी सुभाष सूर्यवंशी, दिलीपराव पाटील, माणिकराव गायकवाड, शंकरराव पाटील, माणिकराव पाटील, रणजित गायकवाड, सुश्मिता जाधव, संजय पाटील, विजय कुंभार, दिलीपराव देसाई आदींसह कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. सुभाष शिंगटे यांनी आभार मानले.
जनावरांचा बाजार
यावेळी बाजार समितीचे सभापती आनंदराव पाटील म्हणाले की, ताकारी बाजार आवारात सव्वा कोटी रुपये खर्चून पायाभूत सुविधा देत आहोत. आष्टा येथील हळद सौद्यांना चांगला प्रतिसाद आहे. चिकुर्डे येथे जनावरांचा बाजार सुरु करण्याचा प्रयत्न आहे. यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज आहे.