रेल्वे मंत्रालयाने लांब पल्ल्याच्या गाड्यांबाबत घेतला मोठा निर्णय, स्लीपरऐवजी आता..; सामान्य प्रवाशांना भुर्दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2023 12:18 PM2023-03-23T12:18:52+5:302023-03-23T12:19:33+5:30
स्लीपरच्या आरक्षित तिकिटासाठी प्रिमियम दर मोजावा लागणार
सदानंद औंधे
मिरज : रेल्वे मंत्रालयाने लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यात स्लीपर बोगींची संख्या कमी करून तृतीय श्रेणी इकाॅनाॅमी वातानुकूलित बोगी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे स्लीपर श्रेणीची संख्या कमी हाेऊन नाइलाजाने वातानुकूलित इकाॅनाॅमी बोगीतून प्रवास करावा लागणार असल्याने सामान्य प्रवाशांना आर्थिक भुर्दंड बसणार आहे. मिरजेतून दिल्लीला जाणारी गोवा एक्स्प्रेस जूनपासून संपूर्ण वातानुकूलित होणार असून या गाडीला केवळ दोनच स्लीपर बोगी असणार आहेत.
रेल्वेने दि. ११ नोव्हेंबर २०२२ रोजी तृतीयश्रेणी इकॉनॉमी व तृतीयश्रेणी वातानुकूलित श्रेणीचे एकत्रीकरण करून भाडेरचनेचेही एकत्रीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. तो निर्णय मागे घेऊन आता तृतीयश्रेणी इकॉनॉमीचे बुकिंग सर्व रेल्वेगाड्यात पुन्हा सुरू करण्यात आले आहे. २२ मार्चपासून या निर्णयाची देशभरात अंमलबजावणी सुरू झाली आहे.
रेल्वेने सप्टेंबर २०२१ मध्ये वातानुकूलित बोगीपेक्षा आठ टक्के स्वस्त तृतीयश्रेणी इकॉनॉमी वातानुकूलित बोगी सुरू केली. १४ महिन्यात नोव्हेंबर २०२२ मध्ये ते बंद करून त्याचे भाडे तृतीयश्रेणी वातानुकूलित बोगीप्रमाणे केले. रेल्वे बोर्डाच्या व्यवस्थापकांनी मंगळवार, २१ रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार आता पुन्हा प्रवाशांना इकॉनॉमी वातानुकूलित बोगी आठ टक्के कमी भाड्यात उपलब्ध करण्यात आली आहे.
मिरजेतून येणाऱ्या जाणाऱ्या एक्स्प्रेसपैकी गोवा-दिल्ली निजामुद्दीन एक्स्प्रेसमध्ये १६ जूनपासून नऊ तृतीयश्रेणी इकॉनॉमी वातानुकूलित बोगी जोडण्यात येणार आहेत. यासाठी दहा स्लीपर बोगीपैकी दोनच ठेवण्यात येणार आहेत. यामुळे स्लीपरमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी अडीचपटीने जास्त असलेल्या वातानुकूलित बोगीचे भाडे देऊन प्रवास करावा लागणार आहे. मात्र तृतीयश्रेणी इकॉनॉमीचे भाडे वातानुकूलित बोगीपेक्षा स्वस्त असल्याने प्रवाशांना दिलासा मिळणार असल्याचा रेल्वेचा दावा आहे.
केवळ आठ टक्के कमी भाडे
तृतीयश्रेणी इकॉनॉमी वातानुकूलित बोगीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशाला तृतीयश्रेणी वातानुकूलित बोगीप्रमाणे बेडरोल मिळत नाही. बेडरोलची आवश्यकता असेल तर जादा पैसे मोजावे लागतात. याचे नाव ‘इकाॅनाॅमी’ असे असले तरी केवळ आठ टक्के कमी भाडे आहे.
स्लीपरच्या आरक्षित तिकिटासाठी प्रिमियम
मिरजेतून येणाऱ्या जाणाऱ्या बेंगलोर-अजमेर, जोधपूर-गांधीधाम, बेंगलोर-दिल्ली संपर्कक्रांती, यशवंतपूर-चंदीगड या गर्दी असलेल्या एक्स्प्रेसमध्येही टप्प्याटप्प्याने स्लीपर बोगी कमी करून इकाॅनाॅमी वातानुकूलित बोगी जोडण्यात येणार असल्याने रेल्वे प्रवास महागणार आहे. स्लीपर बोगी कमी झाल्याने स्लीपरच्या आरक्षित तिकिटासाठी प्रिमियम दर मोजावा लागणार आहे.