ईडी, सीबीआयचे अधिकारी मोदी-शहांचे कार्यकर्ते - राजू शेट्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2019 06:19 AM2019-09-29T06:19:06+5:302019-09-29T06:19:29+5:30
सध्या देशात आणीबाणीहून अधिक भयंकर परिस्थिती असून, इडी, सीबीआय आणि प्राप्तीकरचे अधिकारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे कार्यकर्ते असल्याप्रमाणे कारभार करीत आहेत
सांगली : सध्या देशात आणीबाणीहून अधिक भयंकर परिस्थिती असून, इडी, सीबीआय आणि प्राप्तीकरचे अधिकारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे कार्यकर्ते असल्याप्रमाणे कारभार करीत आहेत, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत केली.
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागा वाटपाचा तोडगा दोन दिवसांत निघणार असून, आघाडीतील घटक पक्षांना ५० जागा सोडण्याची मागणी केली आहे, असेही त्यांनी सांगितले. शेट्टी म्हणाले, निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्याचा प्रयत्न केला आहे. पवार यांचा राज्य सहकारी बँकेशी कोणताही संबंध नसताना त्यांना गोवण्याचा प्रयत्न केला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी घटक पक्षांना सध्या ३८ जागा देण्यास सहमती दर्शविली आहे. उर्वरित १२ जागा वाढवून देण्यात आघाडीला कोणतीही अडचण नाही.
पूरग्रस्तांची फसवणूक
राज्य शासनाने पूरग्रस्तांच्या सानुग्रह अनुदानातील ग्रामीणमध्ये पाच आणि शहरी भागात दहा हजार जमा केलेले नाहीत. ज्यांची घरे पडलेली आहेत, त्यांना घरभाडे अद्याप दिलेले नाही. व्यापाऱ्यांना मदत अद्याप मिळाली नाही. घाईगडबडीत कर्जमाफी जाहीर केली, मात्र यादी जाहीर होण्यास महिना लागेल, अशी वस्तुस्थिती असल्याचे ते म्हणाले.