ED : आता दुसरे पाटील... 'मी भाजपचा खासदार, म्हणून ED इकडं येणार नाही'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 04:32 PM2021-10-24T16:32:06+5:302021-10-24T16:36:59+5:30
सांगली, तासगावमधील एका मॉलच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना खासदार संजय पाटील यांनी ईडीसंदर्भात भाष्य केले. आपल्या भाषणात गमतीशीरपणे ते सांगत असताना, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचाही उल्लेख त्यांनी केला.
सांगली - भारतीय जनता पक्षाकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू असल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून वारंवार करण्यात येतो. तर भाजपकडून कायम या आरोपांना नकार देण्यात येतो. त्यात, काही दिवसांपूर्वी भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी केलेल्या एका विधानाची सध्या सर्वत्र चर्चा रंगली होती. आता, भाजपाखासदार संजय पाटील यांचाही असाच व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये, ईडीसंदर्भात विधान करताना पाटील यांनी आपण भाजपचे खासदार असल्याचं म्हटलं आहे.
सांगली, तासगावमधील एका मॉलच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना खासदार संजय पाटील यांनी ईडीसंदर्भात भाष्य केले. आपल्या भाषणात गमतीशीरपणे ते सांगत असताना, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचाही उल्लेख त्यांनी केला. वैभवदादा मी भाजपचा खासदार आहे, त्यामुळे ईडी काय एवढं इकडं येणरा नाही, असे खासदार संजय पाटील यांनी म्हटले आहे. संजय पाटील यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
आम्ही गाडी वापरताना बँकेचं कर्ज काढून 40 लाख रुपयांची गाडी घेणार, पण लोकांपुढे ते जास्त दिसतं. ईडीनं आमची कर्ज बघितली तर, ती म्हणतील ही माणसं आहेत की काय, एवढी आमची कर्ज आहेत. हर्षवर्धन पाटील यांनी गंमती गंमतीत म्हटलं होतं की, भाजपमध्ये आल्यापासून झोप चांगली लागतेय, अशी आठवणही खा. पाटील यांनी करुन दिली. पाटील यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे आता पुन्हा एकदा भाजप आणि ईडीची चर्चा रंगली आहे.
काय म्हणाले होते हर्षवर्धन पाटील
हर्षवर्धन पाटील यांनी काही दिवसांपूर्वी मावळमधील एका कार्यक्रमात एक महत्त्वाचं वक्तव्य केलं. आपण काँग्रेस सोडून भाजपमध्ये का आलो, या प्रश्नाचं उत्तर दिलं. 'स्टेज गमतीशीर आहे. आम्हाला भारतीय जनता पक्षात जावं लागलं. स्टेजवर एकानं बसल्या बसल्या विचारलं भाजपमध्ये का गेलात..? मी त्यांना म्हटलं, हे मला विचारण्यापेक्षा आपल्या नेत्याला विचारा हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये का गेला? सध्या सगळं मस्त आहे, निवांत आहे. चौकशी वगैरे काही नाही. शांत झोप लागते,' असं पाटील म्हणाले होते.