सांगलीतील शेअर गुंतवणूक घोटाळ्याची ‘ईडी’कडून गंभीर दखल- नितीन चौगुले

By अविनाश कोळी | Published: September 24, 2022 06:59 PM2022-09-24T18:59:05+5:302022-09-24T18:59:13+5:30

प्रकरणातील राजकीय दबावाचीही तक्रार

ED takes serious notice of share investment scam in Sangli - Nitin Chowgule | सांगलीतील शेअर गुंतवणूक घोटाळ्याची ‘ईडी’कडून गंभीर दखल- नितीन चौगुले

सांगलीतील शेअर गुंतवणूक घोटाळ्याची ‘ईडी’कडून गंभीर दखल- नितीन चौगुले

Next

सांगली : शेअर बाजारातील गुंतवणुकीतून नफ्याचे आमिष दाखवून सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल साडेतीन हजार कोटींचा घोटाळा विविध कंपन्यांनी केला आहे. यासंदर्भातील कागदपत्रे शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने सक्तवसुली संचालनालयाकडे (ईडी) सादर करण्यात आली असून, त्यांनी याची गंभीर दखल घेतली आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक नितीन चौगुले यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले की, या घोटाळ्याबाबत नुकतीच आम्ही मुंबईतील ‘ईडी’च्या विभागीय संचालकांची भेट घेतली. अधिकाऱ्यांना सर्व तक्रारी, पोलिसांत दाखल झालेले एफआयआर व कंपन्यांनी केलेल्या घोटाळ्याबाबतची कागदपत्रे दाखविली. घोटाळ्याची व्याप्ती पाहून या विभागाने याची दखल घेतली. संबंधित जिल्हा पोलीस प्रमुखांकडून याबाबतची माहिती मागविण्याचे, योग्य ती चाैकशी व कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.

फसवणूक झालेल्या लोकांमध्ये सामान्य नागरिक, व्यावसायिकांसह डॉक्टर, वकील, शासकीय अधिकारी, अभियंते अशा प्रतिष्ठित लोकांचाही समावेश आहे. प्रतिष्ठेपायी ते तक्रार देण्यास पुढे येत नाहीत. वास्तविक आम्ही कोणत्याही तक्रारदाराची नावे जाहीर करीत नाही. त्यामुळे ज्यांची फसवणूक झाली आहे, अशा लाेकांनी तक्रारी दाखल कराव्यात. जे तक्रार करतील त्यांचे पैसे थेट वसूल करून देण्याचे अधिकार ईडीला आहेत. त्यामुळे जिल्ह्यातून जास्तीत जास्त तक्रारी दाखल करण्यासाठी प्रतिष्ठान प्रयत्न करीत आहे.

तक्रार करू पाहणाऱ्यांवर कंपनीचे संचालक, तसेच राजकीय लोकही दबाव टाकत आहेत. लोकांना धमक्या दिल्या जात आहेत. गुंतवणूकदारांनी याबाबत आमच्याकडे तक्रारी केल्या होत्या. त्यानुसार संबंधित राजकीय लोकांची नावे ईडीला कळविली आहेत. त्यामुळे त्यांचाही या घोटाळ्यातील सहभाग उजेडात येईल, असे चौगुले म्हणाले.
चौकट

४० गुंतवणूकदारांच्या तक्रारी

जिल्ह्यात आजवर ४० गुंतवणूकदारांनी २२ कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यांच्या तक्रारींची रीतसर नोंद झाली आहे. पोलिसांनीही संबंधित कंपन्यांच्या संचालकांची ७ कोटींची मालमत्ता ताब्यात घेतली आहे. ईडीने लक्ष घातल्यास कंपन्यांकडील मालमत्तांच्या माध्यमातून तक्रारदारांना थेट पैसे मिळू शकतात, असे चौगुले म्हणाले.

Web Title: ED takes serious notice of share investment scam in Sangli - Nitin Chowgule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.