ऐन दिवाळीत ग्राहकांना आर्थिक फटका, दसऱ्याला स्वस्त मिळालेले खाद्यतेल दिवाळीला महागले
By अविनाश कोळी | Published: October 11, 2022 12:19 PM2022-10-11T12:19:08+5:302022-10-11T12:20:12+5:30
खाद्यतेलाचे दर काही काळ स्थिर राहण्याचा तज्ज्ञांचा अंदाज खोटा ठरल्याने ग्राहकांना आर्थिक फटका
अविनाश कोळी
सांगली : दसऱ्याला विक्रमी पातळीवर स्वस्त झालेले खाद्यतेल ऐन दिवाळीच्या तोंडावर पुन्हा महागले आहे. त्यामुळे सणाचे बजेट वाढणार आहे. खाद्यतेलाचे दर काही काळ स्थिर राहण्याचा तज्ज्ञांचा अंदाज खोटा ठरल्याने ग्राहकांना आर्थिक फटका बसणार आहे.
मागील काही वर्षांत खाद्यतेलांच्या दरवाढीने नागरिकांना हैराण केले होते. महागाईच्या आगीत खाद्यतेलाच्या दराने तेल ओतण्याचे काम केले होते. यंदाचा दसरा तुलनेत खूप दिलासादायी ठरला. खाद्यतेल स्वस्त झाल्यामुळे सणाचा उत्साह द्विगुणित झाला होता.
दसऱ्यालाही खाद्यतेलाची मागणी वाढली होती, तरीही दर स्थिर राहिले. दिवाळीत मात्र खाद्यतेलांनी अचानक भाव खाल्ल्याने नागरिकांच्या डोईवर चिंतेचे ढग दाटले आहेत.
६ ते ८ टक्क्यांपर्यंत दरवाढ
दसऱ्याच्या तुलनेत सध्या सूर्यफूल, सरकी, शेंगतेल व सोयाबीन तेलाच्या दरांमध्ये ६ ते ८ टक्के दरवाढ झाल्याचे दिसून आले आहे. पंधरा दिवसांच्या कालावधीतच ही दरवाढ झाली आहे.
असे वाढले दर (प्रति किलो)
तेल - २५ सप्टेंबर - १० ऑक्टोबर
शेंगतेल - १९२ - १९४
सूर्यफूल - १५० - १६५
सोयाबीन - १४० - १४८
सरकी - १४२ - १५०
का वाढले दर ?
सध्या दिवाळीमुळे खाद्यतेलांच्या देशांतर्गत मागणीत वाढ झाली आहे. याशिवाय जागतिक बाजारातही खाद्यतेलाच्या मागणीत अचानक वाढ नोंदली गेली आहे. त्यामुळे देशांतर्गत पुरवठ्यावर त्याचा परिणाम झाल्याने दरात वाढ झाली आहे. ही दरवाढ किती दिवस राहील, याचा अंदाज नाही.
अंदाज खोटा ठरला...
खाद्यतेलाचे दर आता सणासुदीच्या काळात स्थिर राहतील, असा अंदाज राष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञांनी व्यक्त केला होता. मात्र, आताच्या दरवाढीने हे अंदाज खोटे ठरविले आहेत. भारताने सणांच्या पार्श्वभूमीवर ८ टक्के जादा खाद्यतेलांची आयात सप्टेंबर महिन्यात केली होती.
मालाची आवक घटल्याने, तसेच जागतिक स्तरावर मागणी वाढल्याने दरवाढ झाली आहे. दिवाळी सण बारा दिवसांवर आला असून, या काळात दर कसे राहतील, याचा अंदाज अद्याप बांधता येणार नाही. - राहुल कापशीकर, खाद्यतेल विक्रेते
दसऱ्यालाच खरेदी करायला हवी होती
दिवाळीला लागणाऱ्या खाद्यतेलाची खरेदी दसऱ्यालाच करायला हवी होती, असे आता वाटत आहे. तेलाच्या दरवाढीने चिंता वाढली आहे. - संगीता कांबळे, गृहिणी
दसऱ्याला दर कमी झाल्याने दिवाळीत आणखी कमी होतील, असे वाटत होते. त्यामुळे त्यावेळी गरजेपुरती खरेदी केली होती. - पार्वती सुतार, गृहिणी